पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगरमध्ये अलिशान पोर्शे कार अपघातावरुन अनेक मुद्दे चर्चेत आले आहे. या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. त्यातच अपघात झाल्यानंतर अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने कार चालवत दोघांनी चिरडले आणि या अपघातामध्ये २ तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यावरुन राज्यभर संतापाची लाट उसळली असून तरुणांमध्ये व्यसनाचे प्रमाण अधिक असल्याचा मुद्दा आता समोर आला आहे.
जगप्रसिद्ध असलेल्या शहरातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलांच्या वसतिगृहात अंमली पदार्थ सापडले आहेत. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मात्र या प्रकरणी विद्यापीठ प्रशासन ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी युवा सेनेचे शहरप्रमुख राम थरकुडे यांनी विद्यापीठाला पत्र दिले आहे.
‘काही दिवसांपूर्वी विद्यापीठाच्या मुलांच्या वसतिगृहात अंमली पदार्थ आढळून आले होते. विद्यापीठाच्या आवारात अंमली पदार्थ सापडणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या बाबत विद्यापीठाकडून तातडीने पावले उचलणे अपेक्षित असताना विद्यापीठाकडून काहीच पाऊले उचलली गेली नाहीत. विद्यापीठात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. तसेच विद्यार्थी चुकीच्या मार्गाला लागणार नाहीत याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. या अनुषंगाने विद्यापीठाने संबंधित विद्यार्थ्यांचे वय, शिक्षण लक्षात घेता त्यांचे समुपदेशन करावे, असे थरकुडे यांनी विद्यापीठ प्रशासनाला दिलेल्या पत्रामध्ये नमूद केले आहे.
या प्रकरणात गेल्या १० दिवसांत विद्यापीठ प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यापीठाची भूमिका आणि निष्क्रियता संशयास्पद आहे. २ दिवसात याबाबत कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा थरकुडे यांनी विद्यापीठ प्रशासनाला दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-