भिगवण : तक्रारवाडी गावातील बारामती-राशीन रोड लगत असणारे अतिक्रमण गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेला आहे. यामुळे ग्रामस्थांनी 26 जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर संबंधित ठिकाणी असलेले अतिक्रमण काढून तिथे नवीन गाळे बांधण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. परंतु, अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपचांयतकडून कोणतीही हालचाल होत नसल्याने गावातील काही तरुणांनी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान 26 जानेवारी रोजी झालेला ग्रामसभेत अतिक्रमणाचा मुद्दाच चांगलाच गाजला. रोड लगत असणारे अतिक्रमण काढून संबंधित जागेवर कायदेशीररित्या नवीन गाळे बांधावेत, अशी मागणी गावातील लोकांनी ग्रामसभेत केली. तसेच संबंधित अतिक्रमण हे 15 फेब्रुवारीपर्यंत काढण्यात यावेत, अशीही मागणी ग्रामस्थांनी ग्रामसभेत केली आहे. मात्र, आता दिलेली मुदत काही दिवसांवर आली, तरी ग्रामपंचायतीकडून संबंधित ठिकाणी कोणतीही कारवाई केल्याचे दिसून येत नाही.
अतिक्रमण धारकांना ग्रामपंचायतीने वारंवार नोटीस देऊन देखील संबंधित अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण काढले नाही. परंतु, सार्वजनिक बांधकाम उपविभाग भिगवण यांनी नोटीस दिल्यानंतर त्यांनी निम्मे अतिक्रमण काढले. आता उर्वरित अतिक्रमण ग्रामपंचायत कधी काढणार, असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. तसेच ग्रामसभेत ऑन कॅमेरा रेकॉर्डिंग झालेल्या ठरावाचे प्रोसेडिंग तयार करण्यात आले नाही. ग्रामसेवक कोणाच्या दबावाखाली ऑन कॅमेरा रेकॉर्डिंग झालेल्या विषयाचे प्रोसेडिंग तयार करीत नाहीत, तयार केलेच तर झालेले विषय प्रोसेडींगवर असतील का? याबाबत ग्रामस्थांच्या मनामध्ये शंका आहे. प्रोसेडींगबाबत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांच्याशी वारंवार बातचीत करून देखील त्यांच्याकडून याबाबत समाधानकारक उत्तर मिळत नाही.
तसेच, 15 फेब्रुवारीपर्यंत ग्रामपंचायतीने अतिक्रमणांवर कोणतीही कारवाई केली नाही, तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करू, असा इशारा गावातील काही तरूणांनी दिला आहे. त्यामुळे अतिक्रमण धारक आणि सदर तरुणांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने सर्वांना विश्वासात घेऊन लवकर मार्ग काढण्याची गरज निर्माण झाली आहे.
ग्रामसभेत झालेल्या गाळे बांधण्याच्या ठराव हा सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांच्या उपस्थितीत मासिक मिटींगमध्ये घेतला जाणार आहे. त्यानंतर जो काही निर्णय होईल, तो निर्णय प्रोसेडिंगवर घेतला जाईल.
सध्या जे अतिक्रमण आहे, त्या जागेवर गावातील मोजकेच लोक स्वतः व्यवसाय करत आहेत. तर उर्वरित अतिक्रमण धारकांनी गाळे बांधून भाड्याने दिले आहेत. यामुळे संबंधित जागेवर कायदेशीररित्या गाळे बांधण्याची ग्रामस्थांनी केलेली मागणी योग्य वाटते.
– राणी नितीन काळंगे, ग्रामपंचायत सदस्य
२६ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत बारामती- राशीन रोडवरील अतिक्रमण काढून संबंधित जागेवर गाळे काढावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ही ही मागणी पूर्णपणे संयुक्तिक आहे.
-मंदाकिनी मोरे, ग्रामपंचायत सदस्य
बारामती- राशीन रोड लगत असणारे अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायतने गटविकास अधिकारी, तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. यामुळे संबंधित अतिक्रमणांवर होणारी कारवाई ही वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार होणार आहे.
– सतीश विनायक वाघ, ग्रामपंचायत सदस्य
अतिक्रमण धारक हे गावातीलच तरुण असून त्या ठिकाणी ते स्वतः व्यवसाय करीत असतील, तर त्यांना विश्वासात घेतले पाहिजे. त्यांच्यावर अन्याय न होता, गावातील सर्व युवकांना रोजगाराची समान संधी उपलब्ध व्हावी, या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
– शरद संपत वाघ, ग्रामपंचायत सदस्य
सदरील जागा ही सुरुवातीला मोकळी होती. त्यामुळे आम्ही तेथे व्यवसाय सुरु केला. पण कालांतराने त्या ठिकाणी अनेकांनी मोठ्या जागा धरुन व्यवसाय सुरु केले. आता येथे व्यवसाय करणारे गावातीलच मोजकेच तरुण आहेत. परंतु, काही तरुणांनी गाळे बांधून स्वत: व्यवसाय न करता ते गाळे दरमहा एका विशिष्ट रक्कमेने भाडे तत्वावर दिले आहेत. ग्रामपंचायत जर या ठिकाणी गाळे बांधणार असेल, तर तो निर्णय योग्य वाटतो. गाळे बांधले, तर त्याठिकाणी जे आधी व्यवसाय करत आहेत त्यांनाही व्यवसायासाठी प्राधान्य द्यावे, ही माफक अपेक्षा.
– अतिक्रमण धारक