Winter Health : बदलत्या ऋतूमध्ये आपल्या आहारामध्ये बदल करणे महत्वाचे असते. सध्या हिवाळा ऋतू सुरु असून हिवाळ्यात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे. सध्याच्या काळात सर्व भाज्या कोणत्याही ऋतूमध्ये मिळतात. त्यामुळे कोणत्या सिझनमध्ये कोणत्या भाज्या खाव्यात हे लवकर समजत नाही. प्रत्येक ऋतुनुसार आपल्या शरिरात बदल होतात त्यामुळे आपल्या आहारात देखील बदल करणे आवश्यक असते. हिवाळ्यात अनेके आजारांना आमंत्रण मिळत असते. त्यामुळे आपल्या आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.
हिवाळा या ऋतूमध्ये आपल्याला खूप भूक लागते. अशावेळी आपण सारखे काहीना काही खात असतो. पण अशातच आपल्या शरिराला जे पदार्थ हानीकारक आहेत ते देखील खाल्ले जातात. परिणामी अनेक आजार होऊ शकतात.
हिवाळा हा ऊर्जेची साठवणूक करण्यासाठी तसेच ऊर्जेचा संचय करण्यासाठी अतिशय उत्तम ऋतू मानला जातो. हिवाळा ऋतूमध्ये तापमान कमी झाल्याने थंडी पडलेली असते. त्यामुळे आपली त्वचा कोरडी पडायला लागते. त्वचेचा कोरडेपणा टाळण्यासाठी आपण दुग्धजन्य तसेच स्निग्ध पदार्थांचा वापर आहारात करायला हवा. खजूर गोड असल्याने त्वरीत ऊर्जा मिळण्यास या फळाचा उपयोग होतोच. पण हार्मोन्सचे संतुलन राखले जावे, जळजळ कमी व्हावी आणि प्रतिकारशक्ती चांगली राहावी यासाठी खजूर खाणे फायदेशीर ठरते.
हिरव्या पालेभाज्या : हिवाळ्यात पालेभाज्या अतिशय ताज्या व स्वच्छ मिळत असतात. याचा खूप चांगला फायदा आपल्या शरीराला होतो म्हणून पालेभाज्या खाणे गरजेचे आहे. पालेभाज्यामुळे रक्त शुद्ध होते आणि निरोगी राखले जाते. मेथीमध्ये औषधी गुणधर्म असतात. मेथीमध्ये, पोटॅशियम, फायबर, लोह, कॅल्शियम, विटामिन डी आणि विटामिन सीच्या पोषक तत्व असतात. मेथीमुळे संधिवात आणि हाडे दुखी यासाठी देखील खूप फायदेशीर ठरते.
मध : थंडीच्या दिवसात मध तुमच्या शरीरात उष्णता वाढवण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये मधाचा तुमच्या आहारात समावेश करणं खूप गरजेचं आहे. थंडीच्या दिवसांत सर्दी किंवा खोकला झाल्यानंतर मध उपयुक्त ठरते. मध आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते.
गूळ : गूळ हा शरीरासाठी खूप पौष्टिक असतो. थंडीच्या दिवसांमध्ये सुद्धा गुळाचा समावेश आपल्या आहारात करणं खूप फायदेशीर ठरतं. गूळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरात उष्णता टिकून राहते. तसेच आपल्या शरीराला लोह देखील मिळते. गुळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील अशक्तपणा कमी होण्यास देखील मदत होते.
बाजरी : बाजरी ही उष्ण असते त्यामुळे थंडीच्या दिवसांत बाजरीची भाकरी किंवा बाजरीपासून बनवलेले अन्य पदार्थ खावेत. बाजरी ही आपल्या हाडांना मजबूत करण्यासाठी महत्वाचा स्त्रोत ठरते. तसेच शरिरात उष्णता निर्माण करते.