पुणे : पुण्यात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर शुक्रवारी भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला. राष्ट्र सेवा दल येथील हॉलमध्ये नियोजित निर्भय सभेला जात असताना त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. त्यावरुन आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट पुणे पोलीस आयुक्तांवर निशाणा साधला आहे.
‘पुण्यातील जे पोलीस आयुक्त आहेत, त्यांनी जेव्हा चार्ज घेतला तेव्हा त्यांनी सर्व गुंडांची परेड काढली आणि एक मोठा शो केला. मग ज्या गुंडांनी निखिल वागळेंवर हल्ला केला त्यांची परेड का काढली नाही. शो करु नका, त्या गुंडांची परेड काढा’, असे म्हणत संजय राऊत यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना आव्हान दिले आहे.
हे कोण गुंड आहेत? कुठल्या पक्षाचे आहेत? तुम्ही घाबरले का? परेड तर त्यांची व्हायला हवी होती. त्या गुंडांचं काय झालं? मुख्यमंत्री आणि गृहमंत्री त्या गुंडांचं समर्थन करत आहेत, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
‘तुमच्यावर राजकीय दबाव आहे का, ही नाटकं बंद करा. ज्यांनी निखिल वागळे, असीम सरोदे, विश्वंभर चौधरी यांच्यावर हल्ला त्यांचीही परेड काढा, त्यांच्या हातात बेड्या घालून त्यांना पुण्याच्या रस्त्यावरुन फिरवा, तर तुम्ही पोलीस आयुक्त नाहीतर तुम्ही भाजप कार्यकर्ते’, असं म्हणत राऊतांनी पोलिसांवर आरोप केला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात या गुंडगिरीविरोधात कुठल्या प्रकारचं आंदोलन करता येईल यावर आम्ही चर्चा करत आहोत. या गुंडगिरीविरोधात आम्ही आवाज उठवणार. आम्ही रस्त्यावर उतरु, जनता शांत बसणार नाही, असा इशाराही संजय राऊतांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शरद मोहोळच्या पत्नीला धमकावणारा आरोपी ससूनमधून फरार; पोलीस दलात खळबळ
-पुण्यात पुन्हा एकदा थाडथाड; आधी मित्रावर गोळीबार पुन्हा स्वतःला संपवलं
-वागळे हल्ला प्रकरण: भाजपचे दीपक पोटे, बापू मानकरांसह १० जणांना पोलिसांनी केली अटक
-‘पक्ष म्हणून आम्ही तुमच्या पाठिशी’; निखिल वागळेंना समर्थन देणारा नेता कोण?
-पुण्याचे नवनियुक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर ‘आप’चा आक्षेप; निवडणूक आयोगाकडे तक्रार