पुणे: राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक गेली तीन वर्षांपासून रखडली आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असणाऱ्या विविध याचिकांमुळे रखडलेली ही निवडणूक लवकरच होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. परंतु दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्या (दि २२) होणारी सुनावणी होणार नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पुणे महापालिकेसह राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
राज्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागल आहे. राज्यामध्ये महायुती सरकार मोठ्या मताधिक्याने सत्तेवर आले असल्याने न्यायालयातील याचिकांवर सुनावणी होऊन लवकरच निवडणूक जाहीर होईल, अशी आशा इच्छुकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. नवीन सरकारकडून मात्र निवडणुक घेण्यासाठी तातडीने कार्यवाही होताना दिसत नसल्याने सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील नाराजीचा सूर आहे.
गेली तीन वर्षांपासून पुणे महापालिकेसह राज्यभरातील २२ महापालिका, जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुका रखडल्या आहेत. प्रभाग रचना ओबीसी आरक्षण सहजवळपास ५७ वेगवेगळ्या याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत. या याचिकांवर उद्या 22 जानेवारी रोजी सुनावणी होणार होती. परंतु न्यायालयात होणाऱ्या सुनावण्यांच्या यादीमध्ये स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीसंदर्भातील याचिकांचा समावेश नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे ही सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली असून 28 जानेवारी रोजी होण्याची आहे.