पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरुर मांडवगण फराटा येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना त्यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार अमोल कोल्हे पुन्हा रिंगणात उतरण्याची चर्चा आहे, तर महायुतीकडून अद्यापही उमेदवार कोण? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
“आता त्यावेळी (२०१९च्या निवडणुकीत) मी सांगितलं म्हणून तुम्ही अमोल कोल्हे यांना निवडून दिलं, पण आता तो बाबा काही दिवसांनी राजीनामा द्यायचं म्हणाले होते. मी अभिनेता आहे. मला मतदारांना वेळ देता येईना. माझ्या क्षेत्रात माझं नुकसान व्हायला लागलं आहे. मुळात कोल्हे यांचं राजकारण हा पिंडच नाही. आम्हाला उमेदवार मिळाला नाही की आम्ही कलाकार पुढं आणतो“, असं म्हणत अजित पवारांनी अमोल कोल्हेंची खिल्ली उडवली आहे.
“अभिनेता धर्मेंद्र, गोविंदा निवडणुकीला उभे राहतात, राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा उभे राहतात, यांचा राजकारणाशी काय संबंध? या नटनट्यांचं राजकारणात काय काम? अमिताभ बच्चनदेखील निवडणुकीला उभे राहिले आणि निवडून आले. नंतर त्यांना वाटलं, हे राजकारण आपलं काम नाही आणि त्यांनी राजीनामा दिला. सगळं सोडून दिलं. शेवटी त्यांना त्या भागातली विकासाची कामं करायची आवड आहे का हे महत्त्वाचं असतं”, असं अजित पवार म्हणाले आहेत.
“एखादा नवीन माणूस आला तर सुरुवातीला थोडे दिवस आपल्याला बरं वाटतं. दिसायला चांगला… मिशांना पिळ दिला… राजबिंडा गडी पाहिला की आपण त्याला मत देतो. त्यांना उमेदवारी देऊन, प्रचार करून त्यात आमच्याही चुका झाल्या आहेत. आम्हाला काही लोकांच्या मनातलं ओळखता आलं नाही. आम्हाला वाटलेलं की हा (अमोल कोल्हे) चांगला निघेल. पण त्याच्या डोक्यात काय चाललंय. हे कळायला काही मार्ग नाही”, असं म्हणत अजित पवारांनी अमोल कोल्हेंवर निशाणा साधला आहे.
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांना थेट आव्हान देत या वेळी ‘आम्ही शिरूरला दिलेला उमेदवार निवडून आणणार म्हणजे आणणार’, असं वक्तव्य केलं होतं. यानंतर अजित पवारांनी कोल्हेंच्या होम पीचवर दौरेही वाढवल्याचे पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-कोथरुडमध्ये श्रमिकांसाठी मोफत ‘प्रेमाची न्याहारी’ उपक्रम; चंद्रकांत पाटलांनीही घेतला आस्वाद
-अजितदादांच्या स्वागताला हजेरी ते गाडीतून प्रवास, आढळराव पाटलांचं पक्क ठरलंय?
-महायुतीत मतभेद; चंद्रकांत पाटलांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना
-“मला काय माहीत हा दिवटा असा उजेड पाडेल”; अजित पवारांनी उडवली अशोक पवारांची खिल्ली
-पुण्यात महायुतीची महत्वाची आढावा बैठक; खोत, जानकरांना निमंत्रण नाही