पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांच्या बैठका कार्यक्रम आखणी सुरु आहे. त्यातच बारामती लोकसभा मतदारसंघातील विधानसभा इच्छुकांनी ‘आमचे आधी मिटवा, तरच लोकसभा निवडणुकीत कोणाचे काम करायचे, ते ठरवता येईल,’ अशा शब्दांत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या नेत्यांनी आपापल्या श्रेष्ठींना इशारा दिला आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेससाठी महायुतीतील सहकारी पक्षाच्या नेत्यांकडून डोकेदुखी वाढली आहे.
पुण्यात बारामती, शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीतील समन्वयकांची बैठक झाली. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षीय उपस्थितीत झालेल्या या बैठकीत बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदर, भोर, बारामती, इंदापूर, दौंड या ५ विधानसभा मतदारसंघांतील भाजप, सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे समन्वयक उपस्थित होते. त्या वेळी पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे, दौंडचे आमदार राहुल कुल उपस्थित होते.
पुण्यात झालेल्या बैठकीकडे हर्षवर्धन पाटील यांनी पाठ फिरविली होती. या वेळी इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपली भूमिका मांडली. तालुक्यात हर्षवर्धन पाटील महायुतीच्या विरोधात भूमिका घेत आहेत. ते ‘राष्ट्रवादी’च्या कार्यकर्त्यांना त्रास देत असल्याची तक्रार करण्यात आली. पुरंदर विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले माजी मंत्री विजय शिवतारे यांनी काही दिवसांपूर्वी बारामतीत, ‘अजितदादांनी, पुरंदर विधानसभेचा मला शब्द द्यावा,’ अशी जाहीर मागणी केली होती. त्याचा या बैठकीत त्यांनी पुनरुच्चार केला आहे.
‘लोकसभा निवडणुकांचे नियोजन करण्यापूर्वी आमचे विधानसभेचे आधी मिटवा, मग लोकसभेचे काम करायचे का ते पाहू,’ अशा शब्दांत विजय शिवतारे यांनी भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना इशारा दिला आहे. याबाबत लोकसभेतील काही प्रमुख समन्वयकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबत संयुक्त बैठक मुंबईत घ्यावी, अशी मागणी विजय शिवतारे यांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-भाजपचं ठरलंय! पुण्यात मुरलीधर मोहोळ लोकसभेचे उमेदवार?
-धक्कादायक! ड्रग्ज प्रकरणी अटक केलेल्या उपनिरीक्षकाकडून आणखी २ किलो ड्रग्ज जप्त
-‘तुम्हाला कोणी धमकावलं तर मला सांगा, पुढचं मी बघतो’; काकाविरोधात पुतण्याने दंड थोपटले
-‘गद्दारांचा पराभव करुन मीच सेनेचा खासदार’; मावळमध्ये ठाकरे गटाच्या वाघेरेंची प्रचाराला सुरवात