पुणे : लोकसभा निवडणूक तोंडावर आल्याने लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष, नेते नेटाने कामाला लागल्याचे दिसून येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आधीपासूनच मोर्चेबांधणी सुरु केली आहे. पुण्यात मनसेच तिकीट मिळवण्यासाठी तीव्र स्पर्धा आहे.याच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये अंतर्गत चढाओढ दिसून येत आहे. येत्या २ महिन्यात लागणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेमधील अतंर्गत धूसफूस पहायला मिळत आहे. मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे आणि साईनाथ बाबर हे दोघेही पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.
मोर्चेबांधणी करताना आज पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीचे संकेत देणारं स्टेटस ठेवलं आहे. “आता सगळेच म्हणू लागलेत पुणे की पसंत मोरे वसंत”, अशा शब्दात त्यांनी सोशल मीडियावर स्टेट्स ठेवलं आहे. पुण्यात मनसेकडून लोकसभेसाठी तयारी सुरु असल्याचं या स्टेटसमधून स्पष्ट दिसून येत आहे. वसंत मोरेंनी मनसेकडून तिकीट मिळण्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
वसंत मोरेंची सोशल मिडीया पोस्ट
मागील काही दिवसांपूर्वी ‘वसंत मोरे यांना दिल्लीत पाहायचंय’ असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे म्हणाल्या होत्या. मात्र आता शर्मिला ठाकरे यांनीच साईनाथ बाबर यांच्या कार्यक्रमामध्ये ‘साईनाथ दिल्लीला गेला तर दुधात साखर पडेल’ असं म्हटलं आहे. शर्मिला ठाकरेंचं हे वक्तव्य वसंत मोरे यांच्या जिव्हारी लागल्याचं दिसून आलं आहे.
“कुणासाठी कितीबी करा राव, पण वेळ आली की फणा काढतातच पण मी बी पक्का गारुडी आहे. योग्य वेळी सगळी गाणी वाजवणार, असं वसंत मोरे यांनी आपल्या व्हाट्सअॅप स्टेटमध्ये लिहिलं पहायला मिळालं. या सर्व गोष्टी लक्षात घेता मनसेकडून वसंत मोरेंना निवडणुकीचे तिकीट मिळणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.