पुणे : पुण्यातील फायरबँड नेते वसंत मोरे यांनी मनसेला रामराम केल्यानंतर आता वसंत मोरे कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे पाहणं सर्वांसाठी औत्सुक्याचं ठरत आहे. मनसेतून राजीनामा दिल्यानंतर मोरे यांनी महाविकास आघाडीमधील सर्व घटक पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली.
“मी योग्य दिशेने चाललो आहे. संपूर्ण पुणे शहरात कार्यकर्त्यांची टीम फिरत असून सर्वे सुरू आहे. माझा प्रयत्न सुरू आहे. महाविकास आघाडीतून तिकीट मिळण्याची शक्यता आहे. वसंत मोरे पुणे लोकसभेच्या रिंगणात ज्यावेळेस उतरेल त्यावेळेस खऱ्या अर्थाने लोकसभा निवडणुकीला वेगळी रंगत येईल. मी निवडणूक लढण्यावर ठाम आहे. वसंत मोरे पुणे लोकसभेत एक नंबर वर राहील”, असं वसंत मोरे म्हणाले आहेत.
“ही निवडणूक एकतर्फी कशी होईल, हे तुम्हाला दिसणार”
“पुणे लोकसभा निवडणूक आपण लढवणार आहे. त्यासाठीच आपण मनसेतून बाहेर पडलो आहे. ज्या दिवशी मी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, त्या दिवशी पुणे शहरातील चित्र बदलले असणार आहे. त्यानंतर ही निवडणूक एकतर्फी कशी होईल, हे तुम्हाला दिसणार आहे”, असे वसंत मोरे यांनी सांगितले.
“वसंत मोरे यांचं राजकीय भविष्य उज्वल आहे. थोडा वेळ घेत आहे. लोकसभा निवडणुकीला वेळ आहे. मी महविकस आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या नेत्यांची चर्चा सुरू केली आहे. माझ्या उमेदवारीचा जर भाजपला फरक पडणार नसेल तर मला दोन वर्षांपूर्वी पासून भारतीय जनता पक्षात येण्याचा आमंत्रण चंद्रकांत पाटलांनी दिलंच नसतं”, असं वसंत मोरे म्हणाले आहेत.
“मी पुणे लोकसभेवरती लक्ष केंद्रित केलं आहे. त्यामुळे मला इथे निवडणूक जिंकण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील ते मी करत आहे मात्र मी राज साहेब ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यावरती कोणतंही भाष्य करणार नाही. मी नेहमीच भारतीय जनता पक्षाच्या विरोधात संघर्ष करत तयार झालो आहे. त्यामुळे या भेटीवर मी बोलणं टाळतोय”, असंही वसंत मोरे म्हणाले आहेत.
दरम्यान, वसंत मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांची पुण्यातील कार्यालयात भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मुंबईत जाऊन शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर काँग्रेसचे कसबा आमदार रविंद्र धंगेकर यांचीही भेट घेतली आहे. या सर्व भेटीनंतर मोरेंची राजकीय भूमिका काय असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-लागा कामाला! आढळरावांना अजित पवारांची सूचना; शिरूरमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला?
-“फडणवीस कधीच चुकीचा पत्ता टाकत नाहीत, त्यांनी जाहीर केलेला उमेदवार निश्चित विजयी होतील”
-पिंपरी-चिंचवडमध्ये ‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यावसाय; पोलिसांकडून ४ तरुणींची सुटका
-मावळमधून श्रीरंग बारणे हेच महायुतीचे उमेदवार; भाजपचं बंड शमलं