बारामती : राज्यात सध्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे सर्व स्तरातून संतापाची लाट उसळत आहे. अशातच या प्रकरणे नवनवे खुलासे होत असून आरोपींचा संबंध राजकीय नेते, मंत्र्यांशी असल्याच्या चर्चा रंगत आहेत. त्यांच्यासोबतचे राजकीय नेत्यांचे फोटो व्हायरल होत असून या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे. ‘गड्यांनो, आमच्यासोबत कोण फोटो घेतोय याची काळजी घ्या’, असे आवाहन देखील अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
‘अलीकडे गर्दी वाढत आहे. आपले फोटो कार्यक्रमात कोणासोबतही काढले जातात. परंतु, काही वेळा याची किंमत मोजावी लागते. सगळ्यांना आमच्या सोबत फोटो काढायचा असतो, पण फोटो नाही काढू दिला तरी नाराज होतात, गडी बदलला असं म्हणतात. अशातच एखादा नवीन गडी येतो फोटो काढून जातो आणि वाटच लागते, त्यामुळे कार्यकर्त्यांनी देखील आमच्यासोबत कोण फोटो काढताय याची आम्हाला कल्पना कार्यकर्त्यांनी द्यावी’, असा सल्ला देखील अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
‘सध्या राजकारणात काय चाललंय ते पाहा. सगळ्या मंत्र्यांबरोबर या गड्याचा फोटो. सगळं आकरीतच घडतंय. त्यामुळे यदाकदाचित कोणा चुकीच्या माणसाचा फोटो माझ्यासोबत काढला, तर ते मला माहिती नव्हतं, तो चुकून काढला आहे, असे मी सांगेन. मी पोलिसांनाही सांगितले आहे की, कार्यक्रमात असे कोणी फोटो काढत असतील, त्यावर लक्ष द्या. दोन नंबरवाले आणि गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांना आमच्यापासून लांब ठेवा’, असे अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘एका जत्रेनं देव म्हातारा होत नाही’; शरद पवारांच्या खासदाराला मोरेंनी सुनावलं
-ठाकरेसेना स्वबळावर लढणार; ‘हा तर शिवसैनिकांचा विश्वासघात’
-‘लोकांची काम करण्यासाठी खात्याचं काम…’; अजित पवारांच्या मंत्र्यांना सूचना
-पुण्याला २ हजार कोटींचा निधी द्या; काँग्रेसची अर्थमंत्री पवारांकडे मागणी