पुणे- वाढत्या उन्हासोबत लोकसभा निवडणुकीमुळे पुणे शहरातील राजकीय वातावरणही चांगलेच तापू लागले आहे. पुणे लोकसभेसाठी महायुतीकडून मुरलीधर मोहोळ तर कॉंग्रेस आघाडीकडून मैदानात असणारे रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराचा जोर हळूहळू वाढत आहे. कॉंग्रेसमध्ये इच्छुक राहिलेल्या नेत्यांची नाराजी अद्याप कायम आहे. दुसरीकडे भाजपमध्ये मात्र मोहोळ यांना उमेदवारी मिळाल्यानंतर इच्छुक राहिलेले नेते प्रचारात सक्रीय झाल्याच दिसत आहे. भाजपकडून पुणे लोकसभा लढविण्यासाठी इच्छुक असलेले माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर हेही आता सक्रिय झाले असून मोहोळ यांनी देवधर यांची निवासस्थानी भेट घेतली. यावेळी देवधर यांनी तोंड गोड करुन त्यांचा स्वागतपर सन्मान केला आणि विजयासाठी सदिच्छा दिल्या.
पुणे लोकसभेसाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी खासदार संजय काकडे, भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनीलजी देवधर हे इच्छूक होते. या सर्व इच्छुकांनी उमेदवारी जाहीर होण्याअगोदर इच्छुक असल्याची इच्छा व्यक्त करताना शेवटी पक्षाचा आदेश हा अंतिम असल्याचे म्हटले होते. आत्ता स्पर्धेत असलो तरी आमच्यापैकी पक्ष ज्या कोणाला उमेदवारी देईल तेव्हा सर्व गोष्टी विसरून त्याच्या पाठीमागे उभे राहण्याचे भाजपची शिकवण असल्याचेही त्यांनी म्हटले होते. त्याची प्रचिती भाजपमध्ये येत आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीत आणि महत्वाचे म्हणजे ज्या पक्षाचा उमेदवार मोहोळ यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहे. त्या कॉँग्रेस पक्षात अजूनही नेत्यांमध्ये समन्वय नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम दिसून येत आहे. महायुतीचे उमेदवार मोहोळ यांनी प्रचाराबरोबरच त्यांच्याबरोबर लोकसभेसाठी इच्छुक असलेल्यांच्या भेटीचा सपाटा लावला आहे. त्यामुळे त्यांची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. पक्ष नेतृत्वाने नाराजी दूर केल्यानंतर इच्छुक राहिलेले नेते अंगझटकून कामाला लागले आहेत.
मुरलीधर मोहोळ यांनी सुनील देवधर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी दोघांमध्येही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघात मोठ्या विजयाचा निर्धारही दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला.