पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी दमदार पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसाने राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास ओरबाडून घेतला आहे. यंदाच्या दुष्काळाने सर्व शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालं होतं. अशा परिस्थितीतही बळीराजाने तळाहाताच्या फोडासारखी पिकाची काळजी घेत पिके तारली आहेत. त्यातच या वादळी वाऱ्याने हे पीक उद्धवस्त केलं आहे.
इंदापूर तालुक्यातील केळी उत्पादकांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसाने काढणीला आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. केळी बागांसह लहान बागा देखील जमिनीदोस्त झाल्या आहेत. हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावून घेतल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले आहेत.इंदापूर तालुक्यातील शिंदेवाडी परिसरात केळीच्या बागा ज्या तोडणीच्या परिस्थितीत होत्या. त्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशांत निंबाळकर यांची केळी प्रति किलो १४ रुपये दराने बुधवारी तोडणीला जाणार होती. परंतु त्या अगोदरच वादळ आल्याने मोठे नुकसान झाले. एकट्या निंबाळकर यांचा उत्पादनाचा खर्च तीन लाख रुपये वाया गेला आहे.
या केळी बागेतून त्यांना जवळपास १० ते ११ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. त्यावर देखील अवकाळी पावसाने वादळी वाऱ्याने पाणी फेरले आहे. इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी, कंदलगाव, माळवाडी आणि उजनी पट्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. इंदापूर तालुक्यात जवळपास २० हेक्टरवर केळीचे नुकसान झालं असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-उद्धव ठाकरेंना धक्का: पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दिले राजीनामे; लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
-दहावी, बारावीचा निकाल ‘या’ दिवशी होणार जाहीर; वाचा कसा पाहता येणार निकाल
-उन्ह्याळ्यात पडणारा पाऊस आपल्यासाठी चांगला की वाईट? वाचा ही महत्वाची बातमी
-संजय काकडेंच्या अडचणीत वाढ, थेट झाले अजामीनपात्र अटक वॉरंट जारी
-अजित पवार नॉट रिचेबल असल्याच्या चर्चेला पूर्णविराम; अजितदादांची प्रकृती बिघडली