मुंबई : सध्या राज्याच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असून या अधिवेशनामध्ये सत्ताधारी विरोधकांमध्ये तुफान कलगितुरा रंगत आहे. अशातच हे अधिवेशन सुरु असताना सोमवारी विधीमंडळात मोठा गदारोळ झाल्याचे पहायला मिळाले. खासदार राहुल गांध यांनी लोकसभेत केलेल्या भाषणावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भूमिका मांडावी, अशी मागणी सत्ताधारी आमदारांनी केली आहे.
सत्ताधारी आमदारांच्या मागणीवरुन अंबादास दानवे यांनी आक्रमक होत भर सभागृहात भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली. यावेळी प्रसाद लाड यांनी देखील त्यांना प्रत्युत्तर देत शिवीगाळ केल्याचे पहायला मिळाले. यावरुन दोन्हा बाजूने शिवीगाळ झाली असून विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांनी दानवे यांना ५ दिवसांसाठी निलंबित केले आहे. यावर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. विरोधी पक्षनेत्यांवर षडयंत्र रचून निलंबनाची कारवाई करण्यात आली, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे यांना दानवेंनी केलेल्या शिवीगाळबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी महाराष्ट्रातील सर्व माता भगिणींची माफी मागितली. यासोबतच त्यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या काही नेत्यांची नावे घेत त्यांनीदेखील माफी मागावी किंवा त्यांच्यावरही अंबादास दानवे यांच्यासारखी कारवाई व्हावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
“अंबादास दानवे यांच्याबद्दल आक्षेप काय आहे? ते सांगा. का निलंबन केलं? त्यांनी शिवीगाळ केली. बरोबर आहे. त्याबद्दल मी पक्षप्रमुख म्हणून महाराष्ट्रातील माता भगिणींची माफी मागायला तयार आहे. आणि मी माफी मागतो. कारण आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहेच. मग लोकसभा प्रचारादरम्यान भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासभेत कदाचित मोदीजी व्यासपीठावर नसतील, पण मुनगंटीवार यांनी बहीण-भावाबद्दल जे अभद्र वक्तव्य केलं होतं त्याबद्दल कोण माफी मागणार आहे?”, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
“त्यांच्याचमध्ये बसलेले शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना कॅमेऱ्यासमोर शिवी दिली होती. हा माता भगिणींचा अपमान नाही? ज्यांच्यावरती एका महिलेवर विचित्र प्रसंग ओढवला, ज्यांना आम्ही मंत्रिमंडळातून काढून टाकलं होतं, त्यांना तुम्ही मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. हा महिलांचा अपमान नाही?”, असा देखील सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-लोणावळ्यातील दुर्घटनेनंतर मुख्यमंंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश; नवी नियमावली केली जारी
-अजित पवारांना बालेकिल्ल्यात बसणार आणखी मोठा धक्का; कट्टर समर्थकाने घेतली शरद पवारांची भेट
-पुण्यातील मेट्रो स्थानकावर घडली मोठी घटना; प्रवाशाला गमवावा लागला जीव, वाचा नेमकं काय झालं?
-‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’, लाभ घेण्यासाठी काय करायचं? वाचा…