पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. जास्तीत जास्त मतदारसंघ आपल्या वाट्याला यावेत यासाठी महायुती-महाविकास आघाडीतील पक्ष करत आहेत. यामुळेच पुणे शहरातील अनेक मतदारसंघात देखील अशीच लगबग सुरु असल्याचे चित्र आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी पुणे शहराचा विचार केला तर महायुतीला काहीसे प्रतिकूल वातावरण असल्याचे चित्र आहे. नुकत्याच समोर आलेल्या काही सर्वेमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस (SP) आणि शिवसेना (UBT) पक्षाला परिस्थिती अनुकूल असल्याचे दिसत आहे तर कॉंग्रेसच्या ताब्यात असणाऱ्या कसबा मतदारसंघात काट्याची टक्कर पुन्हा एकदा पाहायला मिळू शकते असे सांगितले जात आहे.
दरम्यान, ठाकरे गटाने आता आपले लक्ष खडकवासला आणि वडगावशेरी या मतदारसंघांवर केंद्रित केले असून अनुकूल परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी कंबर कसली आहे. या दोन मतदारसंघातही सेना नेते वडगाव शेरी या मतदारसंघावर भर देत असल्याचे गेल्या काही दिवसातील घडामोडींवरून दिसत आहे.यामुळेच वडगाव शेरी मतदारसंघ सेनेच्या वाट्याला जाईल असे बोलले जात आहे.
या मतदारसंघातून शिवसेनेच्या फायरब्रांड नेत्या सुषमा अंधारे तसेच समाजकार्याच्या माध्यमातून आपली आगळीवेगळी ओळख निर्माण केलेले नितीन भुजबळ यांच्या नावाची चर्चा आहे. लोकांमध्ये देखील गेल्या काही दिवसातील राजकारण पाहून नवा चेहरा या मतदारसंघाला हवा अशी कुजबुज सुरु आहे. यामुळेच ठाकरे गटातील अनेक नेते या मतदारसंघात दौरे करत असून बैठकांचा आणि गाठीभेटींचा धडाका लावला आहे.
दुसरीकडे पवार गटाकडे सध्या स्वतःचा असा कुणीही पावरफुल नेता नसल्याने माजी आमदार बापूसाहेब पठारे, त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे व तीन माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश घडवून आणला मात्र त्याचा फारसा फायदा होईल की नाही हे आताच सांगणे कठीण आहे.जरी बापूसाहेब पठारे यांनी तुतारी हातात घेतली असली तरी अद्याप शिवसेनेने या मतदारसंघावरचा दावा सोडलेला नाही. जिल्ह्यामध्ये शिवसेनेला कमीत कमी तीन तेचार मतदार संघ द्यावे लागणार असून त्यामध्ये वडगाव शेरी चे नाव आघाडीवर आहे यामुळेच शिवसेनेमध्ये इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरूच आहे.
दरम्यान, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबावर आणि त्यांच्या विचारांवर प्रेम करणारा मोठा मतदारांचा बर्ग इथे आहे. सोबतच आदित्य शिरोडकर, सचिन अहिर, आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे यांच्यासह पक्षातील अनेक दिग्गज नेते मंडळी या मतदारसंघात वारंवार दौरे करत असल्याने हा मतदारसंघ ठाकरे गटाला सुटणार असे मानले जात आहे. शेवटी आता हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला जातो की सेनेच्या वाट्याला जातो आणि या मतदारसंघाला नवा फ्रेश चेहरा असलेला आमदार मिळणार का हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.
महत्वाच्या बातम्या-
-जेष्ठ नेताच फडकवणार बंडाचं निशाण?; पुण्यात भाजपमध्ये धूसफूस वाढली
-‘या दादासाठी जशी लाडकी बहिण तसाच….’; आमच्यासाठी काय म्हणणाऱ्या तरुणांना अजित पवारांचं उत्तर
-बाप्पा निघाले गावाला! दुपारचे २ वाजले तरी मिरवणूक काही संपेना