पुणे : पुणे लोकसभा मतदार संघासाठी 13 मे रोजी मतदान पार पडणार असून प्रचारासाठी अवघे तीन दिवस शिल्लक आहेत. महायुतीकडून मुलीदर मोहोळ यांच्या प्रचारासाठी प्रमुख नेत्यांच्या सभांच्या धडाका सध्या शहरभरात दिसून येत आहे. तर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची यंत्रणा राबवण्यासाठी राज्यातील काँग्रेस आमदारांना बाहेरून बोलवण्यात आलं आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे आणि AIMIM चे अनिस सुंडके हे देखील आपल्या परीने प्रचार यंत्रणा राबवताना दिसत आहेत. मतदानाला चार दिवस उरले असताना कोण सरस ठरणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे.
पुणे लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे कॅंटॉन्मेंट या चार मतदार संघात भाजपचे आमदार आहेत. वडगाव शेरीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील टिंगरे हे आमदार आहेत. हे पाचही आमदार आपल्या मतदारसंघात पूर्ण ताकदीनिशी मोहोळ यांच्या प्रचारात उतरले आहेत. वडगावशेरीमध्ये आमदार सुनील टिंगरे आणि भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी आमदार बापू पठारे यांच्यामुळे मोहोळ यांना तिहेरी ताकद मिळाली आहे. दरम्यान, सुरुवातीला उमेदवारी मिळण्यावरून असलेली इच्छुकांची नाराजीही संपल्याचे दिसून येत असून माजी खासदार संजय काकडे, सुनील देवधर हेही सक्रिय झाले आहेत. महायूतीचे घटक पक्षातील एकवाक्यता आणि नियोजनबद्ध प्रचार यामुळे मोहोळ यांच्या प्रचारात जोर दिसून येत आहे. राज्याचे नेतेही लक्ष ठेऊन आहेत.
राष्ट्रवादी, शिवसेना अन् मनसेमुळे मोहोळांची बाजू अधिक भक्कम
भाजपच्या सोबतीने मोहोळ यांच्यासाठी महायुतीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे स्थानिक नेते तसेच राज्यस्तरावरील प्रमुख नेते देखील सक्रियपणे काम करताना दिसत आहेत. सुरुवातीलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर मेळावा घेतला होता, तर आता बारामतीचे मतदान आटोपल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पुण्यामध्ये बैठकांवर जोर दिला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना पाठिंबा जाहीर केल्यानंतर पुण्यातील मनसेचे सर्व पदाधिकारी मोहोळ यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. त्यातच राज ठाकरे यांच्या मोहोळ यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मनसेची पुण्यामध्ये एक मोठी वोंटबँक आहे. त्याचाही फायदा मोहोळ यांना होणार आहे. वरील सर्व चित्र पाहता सद्या मुरलीधर मोहोळ हेच सरस ठरताना दिसत आहेत.
धंगेकर यांच्या प्रचारासाठी बाहेरचे आमदार आणण्याची कॉँग्रेसवर आली वेळ
दरम्यान, रवींद्र धंगेकर यांना सुरुवातीपासूनच पक्षांतर्गत कुरघोड्या आणि आघाडीतील सुंदोपसुंदीने ग्रासले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद यामुळे महायूतीच्या गोटात चैतन्याचे वातावरण आहे. तर दुसरीकडे कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची सभा झाल्यानंतरही कॉँग्रेसमध्ये स्थानिक पातळीवर सर्वकाही अलबेल असल्याचे दिसत नाही. कॉँग्रेस वारिष्ठांचा स्थानिक नेतृत्वावरचा विश्वास उडालेला दिसतो आहे. कारण स्थानिक नेत्यांवर अवलंबून न राहता कॉँग्रेसला धंगेकर यांच्या प्रचारासाठी राज्यातील बारा आमदारांसह पराराज्यातील लोकप्रतिनिधींना पाचारण करण्याची वेळ आली आहे. शेवटच्या टप्प्यात कॉँग्रेसने उचलेले हे पाऊल रवींद्र धंगेकरांना तारणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या-
-राज ठाकरेंच्या सभेनिमित्त वाहतूकीत बदल; जाणून घ्या कशी आहे वाहतूक व्यवस्था?
-पवारांच्या आमदाराला अजित दादांचं चॅलेंज; म्हणाले, “अरे मंत्री बनायला निघाला पण आता आमदार कसा होतो…”
-पुण्याच्या मैदानात घुमणार नितीन गडकरींचा आवाज, जाहीर सभेतून मांडणार विकासाचा रोडमॅप
-लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पुण्यात ३ दिवस जमावबंदी; पुणे पोलीस सहआयुक्तांचे आदेश
-‘तेव्हा शरद पवारांच्या अंगावरून साप गेला अन् आठ दिवसांनी…’; सुप्रिया सुळे यांनी सांगितली ‘ती’ आठवण