पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने राज्याच्या राजकारणात नवे वारे वाहू लागले आहेत. राज्यात बारामती लोकसभा मतदारसंघानंतरर महत्वाची निवडणूक म्हणजे शिरुर लोकसभा निवडणूक.. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याविरोधात महायुतीकडून तगडा उमेदवार देण्याची जोरदार तयारी सुरु आहे.
शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ही निवडणूक लढवण्याची जोरदार इच्छा व्यक्त केली होती. मात्र, त्यांना म्हाडाचे अध्यक्षपद दिल्यानंतर त्यांचा जवळपास या निवडणुकीतून पत्ता कट झाला. शिरुर लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या मतदारसंघासाठी अडून असल्यानं शिवाजी आढळराव पाटलांची चांगलीच गोची झाली आहे.
अजित पवारांनी दबावतंत्र अवलंबल्यामुळे शिवाजी आढळरावांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा लागू शकतो. अन्यथा अजित पवारांनी भाजपच्या प्रदीप कंद यांना अमोल कोल्हे यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरवणार असल्याचं सांगत पत्ता खुला केला आहे.
वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि दिलीप वळसे पाटलांच्या उपस्थित २ दिवसांपूर्वी बैठक झाली आहे. स्वतः आढळराव पाटीलही मुंबईत हजर होते. त्यावेळी अजित पवारांनी हे दबावतंत्र अवलंबले आहे. आता अजित पवारांच्या या दबावाला आढळराव पाटील बळी पडण्याची शक्यता आहे.
त्याच पार्श्वभूमीवर आढळरावांनी आज शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या बैठकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत चर्चा करू शकतात. कदाचित ते याबाबतची अप्रत्यक्षपणे घोषणा करण्याची शक्यता ही नाकारता येत नाही.
येत्या काही तासांत आढळरावांना तसा निर्णय घ्यावा लागणार आहे. कारण दुसरीकडे अजित पवारांनी आढळरावांच्या बाले किल्ल्यात अर्थात मंचरमध्ये ४ मार्चला जाहीर सभा घेण्याचं नियोजन आखलंय. त्या सभेत एकतर आढळरावांचा, नाहीतर प्रदीप कंद यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होऊ शकतो. लोकसभेची आचारसंहिता १५ मार्चच्या आधी कधी ही लागू शकते.
आचारसंहिता लागण्याआधी अमोल कोल्हे यांच्या विरोधात महायुतीचा उमेदवार कोण? यावर शिक्कामोर्तब करणं महायुतीसाठी अत्यंत गरजेचं आहे. दरम्यान, आजच्या बैठकीनंतर आढळराव पाटलांचा काय निर्णय असेल? यावरुन महायुतीच्या उमेदवारी निश्चित होऊ शकेत. त्यामुळे आढळराव पाटलांच्या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-अजितदादांच्या धाकट्या चिरंजीवांचा जंगी बर्थडे, म्हणाले “आधी बारामती उरकतो मग पुण्यातच आहे”
-पुण्यात गाडी तोडफोड सुरुच; येरवड्यात कोयता गँग नंतर आता कोंढव्यात दारूच्या नशेत ८ गाड्या फोडल्या
-निलेश राणेंना पुणे पालिकेचा दिसाला; कमीचा धनादेश स्वीकारत थकबाकी केली शून्य
-भाजप इच्छुकांची धाकधूक वाढली; आज कृपाशंकर सिंह जाणून घेणार “मन की बात”
-सगेसोयऱ्यांचा गोतावळ्यामुळे शिवाजी मानकरांना ताकद; पुणे लोकसभेसाठी करणार दावेदारी प्रबळ