पुणे : मार्च महिन्याच्या अखेरीस उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे राज्यातील तापमानाच्या पाऱ्याने चाळीशीपार केली आहे. म्हणूनच नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. राज्यातील तापमानाचा पारा वाढतच आहे. पुणे शहरातील तापमानात प्रचंड वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले असून उष्माघाताचा सामना करावा लागत आहे. थंड हवेतून अचानक उन्हात गेल्यामुळे या काळात विषाणूजन्य आजार वाढण्याचा धोका प्रचंड असतो. ‘डिहायड्रेशन’च्या त्रासामुळे आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होताना दिसून येत आहे. त्यामुळे वाढत्या उन्हाळ्याचा विचार करता या दिवसांत नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून वाढत्या उष्णतेमुळे राज्यात उष्माघाताचे १३ रुग्ण आढळून आले आहेत. रायगडमध्ये दोन, नगर, अकोला, अमरावती, भंडारा, धुळे, सातारा या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली आहे. राज्यात एक मार्च ते ३१ जुलै या कालावधीत सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उन्हाळ्यामध्ये आपला आहार कमी होतो त्यामुळे भरपूर पाणी पिणे आपल्या शरीरासाठी गरजेचे असते. शरीराला आवश्यक तितक्या प्रमाणात पाणी पिले गेले नाही तर डिहायड्रेशनचा त्रास होण्याची शक्यता आसते. डिहायड्रेशनचा त्रास होऊ नये म्हणून रसाळ फळे, भरपूर पाणी, कोकम, सरबत अशी पेये पिणं गरजेचं आहे.
उष्णतेमुळे ज्येष्ठ नागरिकांना डिहायड्रेशन’चा त्रास तीव्र प्रमाणात झाल्यास आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. पायांना सूज येणे, रक्तवाहिन्या गोठणे या प्रकारचा त्रास होऊ शकतो. काही जणांना किडनीसंबंधी आजार होण्याची शक्यता असते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
हे ही एकदा वाचाच
-Health Update | वाढत्या उष्णतेचा त्रास होतोय, मग रोजच्या जेवणात करा ‘या’ पदार्थांचा समावेश