पुणे : छत्रपती संभाज महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ हिंदी चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेता विकी कौशलने छत्रपती शंभूराजांची भूमिका साकारली आहे. या सिनेमाला भारतभर मोठा प्रतिसाद मिळत असून परदेशातही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धूमाकूळ घालत आहे. एकीकडे हा सिनेमा लगोपाठ हाऊसफुल कोट्यावधींची कमाई करत आहे तर दुसरीकडे या सिनेमातील काही प्रसंगांवर पुन्हा एकदा आक्षेप घेण्यात आला आहे.
‘छावा’ चित्रपटाच्या दिग्दर्शकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी गणोजी शिर्के यांच्या वंशजांनी केली आहे. या चित्रपटात गणोजी शिर्के यांच्या व्यक्तिरेखेचे चुकीचे चित्रण केल्याचा आरोप करत वंशजांनी आक्षेप घेतला आहे. गणोजी शिर्के यांच्या वंशजांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेला इतिहास हा खोटा असून दिग्ददर्शकावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.
“या चित्रपटात इतिहासाची तोडमोड केली असून जाणीवपूर्वक इतिहास बदलून दाखवण्यात आला आहे. जाणीवपूर्वक आमच्या घराण्याला बदनाम केलं जात आहे. षड्यंत्र करत बदनामी केली जात आहे. चुकीचा इतिहास दाखवला गेला असून आमच्या राजे शिर्के घराण्याला टार्गेट केलं गेलं आहे. दिग्दर्शकांनी जो इतिहास दाखवला त्यांच्याकडे असे कोणते पुरावे आहेत? त्यांच्याकडे एकही पुरावा नाही.
“चित्रपट दाखवायच्या आधी यांनी आमच्याशी चर्चा करायला हवी होती की यावर तुमचं मत काय आहे आमचा सल्ला घेतला गेला नाही.
‘छावा’ कादंबरी ज्यांनी लिहिली त्यांची देखील भेट आम्ही घेतली होती. राजे शिर्के घराण्याच खूप मोठं योगदान आहे. आम्ही गद्दारी केली असे कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीत मग हे आरोप कसे केले जातात? माहिती अधिकारातही कोणतेही पुरावे सापडले नाहीत. मग यांना कुठून माहिती मिळाली शिर्केंनी गद्दारी केली म्हणून? इतिहास गायब केला जात असून समजता तेढ निर्माण केला जात आहे. आम्ही चित्रपटाच्या विरोधात नाही पण आम्हाला खलनायक करुन सिनेमा प्रदर्शित केला आहे. गणोजी राजे शिर्के यांनी औरंगजेबाला वाट दाखवली नाही”, असे गणोजी शिर्के यांचे वंशज दीपक राजे शिर्के यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
इतिहासाच्या चुकीच्या सादरीकरणामुळे समाजात संभ्रम निर्माण होतो. ‘छावा’ चित्रपटात ऐतिहासिक तथ्यांशी छेडछाड करण्यात आली आहे आणि गणोजी शिर्के यांना खलनायक म्हणून दाखवले गेले आहे, जे ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचे आहे. त्यामुळे एकतर गणोजी शिर्केंबद्दल दाखवलेले प्रसंग बदलण्यात यावेत आणि दिग्ददर्शक लक्ष्मण उतेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिर्के घराण्याने केली आहे.
दरम्यान, हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासून यावर आक्षेप घेण्यात आला होता. छावा चित्रपटाचा ट्रेलर रिलीस झाला त्यावेळी त्यामध्ये छत्रपती शंभू महाराज (विकी कौशल) हे लेझिम खेळताना दाखवण्यात आले होते. यावर काही शिवप्रेमींनी आक्षेप घेत हा सीन कट करण्यास सांगितले. त्यानंतर १४ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर धूमाकूळ घातला. मात्र आता यावर पुन्हा एकदा आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे आता शिर्के घराण्याने घेतलेल्या आक्षेप आणि गुन्हा दाखल करण्याच्या मागणीबाबत काय होणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.
महत्वाच्या बातम्या-
-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; जेवणात किडे-अळ्या, व्हिडीओ व्हायरल
-पीएमपीत ‘मराठी भाषा’ बंधनकारक करण्याचे आदेश; कार्यालयीन कामकाज ‘मराठी’तूनच
-शिंदेंची भेट धंगेकरांना महागात, काँग्रेसने महत्त्वाच्या कमिटीत घेणं टाळलं; नेमकं काय घडलं?
-गजा मारणे टोळीची दहशत, केंद्रीय राज्यमंत्री मोहोळांच्या माणसाला मारहाण; पुण्यात नेमकं चाललंय काय?
-पालिकेचे पाणी पिण्यास योग्य नाहीच! तपासणीतून कोणती माहिती समोर आली?