पुणे : पुणे शहरामध्ये २ दिवस सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे शहराची अक्षरश: दाणादाण उडाली आहे. विकासाच्या नावाखाली शहरात ठिकठिकाणी केलेले सिमेंटचे रस्ते, बुजवलेले किंवा वळवलेले नैसर्गिक प्रवाह, त्यावर केलेली अतिक्रमणे यामुळे शहरावर पूरस्थिती ओढवली. त्यातच पावसाळी वाहिन्या, सांडपाणी वाहिन्यांची कामे पूर्ण केल्याचा महापालिकेचा दावाही खोटा ठरल्याचे उघड झाले. त्यामुळे गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे शहर ‘स्मार्ट सिटी’ ऐवजी गाळात जात असल्याचे भीषण वास्तव पहायला मिळालं आहे.
‘स्मार्ट सिची’चे कार्यालय असलेल्या सिंहगड रोडवरील अनेक भाग नदीपात्रालगत असल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले आहे. बुधवारी मध्यरात्री खडकवासला पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आल्यानंतर या भागातील स्मार्ट पदपथ-सिमेंटच्या रस्त्यांचा भडीमार, उड्डाणपूल व मेट्रोची सुरू असलेली कामे यामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली. २०१९ मध्ये आंबिलओढ्याला आलेल्या पुराची पुनरावृत्ती यंदा झाल्याचे दिसून येत आहे. यावर भूगोल आणि पर्यावरण अभ्यासक डॉ. श्रीकांत गबाले यांनी भाष्य केले आहे.
काय म्हणाले डॉ. श्रीकांत गबाले?
‘धरणक्षेत्रात जवळपास २०० मिलिमीटरपेक्षा जास्त, तर शहरातही ११५ मिलिमीटर पाऊस पडला. कमी वेळात जास्त पाऊस, शहरातील वाहिन्यांची पाणी वाहून नेण्याची अपुरी क्षमता यामुळे पाणी साचले. त्याशिवाय सिमेंटचे रस्ते असलेल्या भागात पाणी साचून राहण्याचे प्रमाण जास्त आहे. विशेषत: चौकांमध्ये पाणी साचते. ओढे, नाले बुजवण्यात आले आहेत, त्यांचे प्रवाह वळविण्यात आले आहेत. नैसर्गिक प्रवाहांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे पाणी वाहून जाण्याऐवजी ते इतरत्र पसरते. नाले, ओढे, सांडपाणी वाहिन्यांत साठून राहिलेल्या प्लॅस्टिकमुळेही पाणी वाहून जाण्यास अटकाव निर्माण होतो.’
शहरामध्ये स्मार्ट सिटीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. हाच खर्च आता पाण्यात गेल्याचे चित्र पुणेकरांना पहायला मिळालं आहे. धरणाचे पाणी सोडण्यापूर्वी नागरिकांना धोक्याची सूचनाही देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे लाखो पुणेकरांची तारांबळ उडाली. विशेष म्हणजे स्मार्ट सिटीच्या अंतर्गत येणाऱ्या बाणेर, बालेवाडीसह सिंहगड रस्ता, वडगाव शेरी, येरवडा, कल्याणीनगर, कोरेगाव पार्क याच भागामध्ये पावसाचा मोठा फटका बसला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Pune Rain: पुणेकरांना काहीसा दिलासा; पाऊस थांबला पण वीज अद्यापही गुल
-पुण्यातील हजारो नागरिकांचा संसार पाण्यात; अजित पवारांनी दिलं ‘हे’ आश्वासन
-पुण्यात पूरस्थिती! मोहोळ अधिवेशन सोडत थेट पुण्यात पोहचणार; जागेवर जाऊन करणार पाहणी