पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीच्या मतदारसंघातील महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटलांनी बारामती मतदारसंघाबाबतही भाष्य केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे बारामतीच्या रणसंग्रामातील ‘कृष्णा’च्या भूमिकेत आहेत, असा दावा यावेळी चंद्राकांत पाटील यांनी केला आहे.
“देवेंद्र फडणवीस यांनी भल्या भल्या नेत्यांची झोप उडवली आहे. कुठल्याही रोगाचे निदान लवकर करून, कोणत्या रुग्णाला कोणती गोळी द्यायची, याची अचूक माहिती असणारे ते डॉक्टर आहेत. त्यामुळे रुग्णालयात जाण्यापूर्वीच रुग्ण बरा होतो. बारामतीच्या रणसंग्रामात फडणवीस हे ‘कृष्णा’च्या भूमिकेत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीस यांना जेवढे दूरचे दिसते तेवढे इतरांना दिसत नाही. ते चुकीचा पत्ता टाकत नाहीत. त्यामुळे फडणवीस ज्यांची उमेदवारी जाहीर करतील, ते निश्चित विजयी होतील”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
“पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ गेल्या वेळच्या मताधिक्क्यापेक्षा अधिक मतांनी जिंकणार. भाजपला ही जागा अवघड आहे, असा आभास विरोधकांकडून करण्यात येत असला, तरी तसे शक्य नाही. यंदा राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हे दोन्ही पक्ष आमच्यासोबत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची काही मते कमी झाली, तरी भाजपला गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक मते मिळतील,” असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. या वेळी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, श्रीनाथ भिमाले, संदीप खर्डेकर हे पदाधिकारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
-पिंपरी-चिंचवडमध्ये ‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यावसाय; पोलिसांकडून ४ तरुणींची सुटका
-मावळमधून श्रीरंग बारणे हेच महायुतीचे उमेदवार; भाजपचं बंड शमलं
-पुण्यात ‘हे’ असणार काँग्रेस उमेदवार; चंद्रकांत पाटलांनी थेट नावच सांगितलं
-‘दादांच्या भूमिकेमुळेच त्यांचं कुटुंब एकटं’; रोहित पवारांचं रोखठोक भाष्य