पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. भाजपने 99 उमेदवारांची घोषणा करत आघाडी घेतली असली तरी महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये देखील काँग्रेस आणि शिवसेनेत सुरू असणाऱ्या धुसफुशीमुळे उमेदवार यादी रखडल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे इच्छुकांची धागणूक वाढली असून इतर पर्यायांची देखील चाचपणी केली जात आहे. पुण्यातील कसबा मतदारसंघात विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. कसब्यात मुस्लिम समाजातील मोठे प्रस्थ असणाऱ्या माजी नगरसेवक मुख्तार शेख यांच्याकडून उमेदवारीवर दावा केला जात आहे. शेख यांनी थेट मराठा आंदोलन जरांगे पाटील यांची भेट घेतल्याने काँग्रेस गोठात खळबळ उडाली आहे.
मुख्तार शेख यांनी सोमवारी अंतरवली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. आपण काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी आग्रही असून पक्ष आपला विचार करेल, असा विश्वास मुख्तार शेख यांच्याकडून व्यक्त केला जात आहे. जरांगे पाटील यांनी सर्व धर्मियांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका घेतल्याने त्यांचा पाठिंबा मिळाल्यास आपण निवडणूक नक्की जिंकू शकतो, असा विश्वास मुख्तार शेख यांना वाटत आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या पुढे कसबा मतदारसंघातील सर्व गणित शेख यांनी मांडल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे या भेटीने मात्र विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांची डोकेदुखी वाढताना दिसत आहे.
कसबा मतदारसंघातून लढण्यासाठी यंदा काँग्रेसमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी दिसत आहे. माजी महापौर कमल व्यवहारे, महिला नेत्या संगिता तिवारी तसेच गेली चार दशके काँग्रेसमध्ये असणारे माजी नगरसेवक मुख्तार शेख हे देखील उमेदवारी मिळवण्यासाठी आग्रही आहेत. शेख यांनी मध्यंतरी काँग्रेस प्रभारी रमेश चैनीथला यांची भेट घेत आपल्याला उमेदवारी देण्याची मागणी केली होती. काँग्रेसकडून अद्याप विधानसभेसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही. असे असताना दुसरीकडे शेख यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-चंद्रकांत पाटलांचं ठरलं! कोथरुडकरांच्या साक्षीने २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज
-पिंपरी: नवनियुक्त शहराध्यक्षाच्या वक्तव्याने मोठा ट्विस्ट; अण्णा बनसोडेंच्या उमेदवारीला विरोध?
-निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात नाकाबंदी; रोज रात्री मद्यपींवर होणार कारवाई, आयुक्तांचे आदेश
-चिंचवडमध्ये राजकीय घडामोडींना वेग; राहुल कलाटेंनी घेतली राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची भेट
-खेड-शिवापूरमध्ये ५ कोटींसह चौघे ताब्यात; शहाजीबापू पाटील अडचणीत, नेमकं काय कनेक्शन?