पुणे : लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या ४ जून रोजी लागणार आहे. त्यातच विरोधी बाकावर असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवरुन सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. त्यातच आता बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्याची व्यथा राज्य सरकारपुढे मांडली. त्यातच आता दूध उत्पादक शेतऱ्यांसाठी सुप्रिया सुळे मैदानात उतरल्या आहेत.
शेतमाला दर नसल्याने राज्यातील शेतकरी चिंताग्रस्त आहे. तर दुसरीकडे दुधाला दर मिळत नसल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवलं आहे. वारंवार दुधाचे दर कमी होत आहेत. याचा फटका दूध उत्पादकांना बसत आहे. येत्या ७ दिवसात दुधाचे दर वाढवा अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला दिला आहे.
“गेल्या काही दिवसांपासून शेतमालाला भाव नसल्यामुळे हवालदिल असलेल्या शेतकऱ्यांना दूधापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा आधार होता. पण हे दर देखील कमी झाले आहेत. एका बाजूला दुधाचे दर कमी होत असताना दुसऱ्या बाजुला पशुखाद्य, चारा यांचे दर अतिशय वाढलेले दिसत आहेत. दुधाच्या कमी झालेल्या दरांमुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहेत. हे लक्षात घेता माझी शासनाला विनंती आहे की, दूधाचे दर पुर्ववत करण्याच्या दृष्टीने सात दिवसांच्या आत शासनाने पावले उचलावीत. अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही”, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
मागील काही दिवसांपासून गाईच्या दुधाला २५ रुपये प्रति लिटरला दर होता. मात्र, दीड महिन्यापूर्वी तो २७ रुपये करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा दोन रुपयांची वाढ करण्यात आली होती. म्हणजे दुधाचे दर जवळपास २९ रुपयांवर पोहोचले होते. अशातच आता पुन्हा २५ मेपासून २ रुपयांनी दर कमी केले आहेत. त्यामुळे सध्या २९ रुपयांपर्यंत पोहोचलेल्या दुधाचे दर आता पुन्हा २७ रुपयांपर्यंत खाली आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Pune | शनिवार वाड्याजवळ बेवारस बॅग, परिसरात उडाली खळबळ
-कालिचरण महाराजांना ‘ते’ वक्तव्य पडणार महागात; राज्य महिला आयोगाचं नाशिक पोलिसांना पत्र
-एकच लक्ष्य ६५ हजार वृक्ष! चंद्रकांत पाटलांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प