पुणे : येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राज्यातील सर्वात चर्चेच्या बारामती मतदारसंघात लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेतही राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार असल्याचे पहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार हे निवडणूक लढणार असल्याची जोरदार चर्चा आहे. बारामती शहरात भावी आमदार म्हणून बॅनर देखील झळकत आहेत. अशातच आता खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती मतदारसंघाबाबत वक्तव्य केले आहे.
बारामतीतून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देणार का? असा प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘विधानसभेसाठी अद्याप जागा निश्चित झालेल्या नाहीत. याबाबत लोकांच्या भावना विचारात घेऊन निर्णय घेतला जाईल. बारामती लोकसभा मतदारसंघ हे माझं कुटुंब आहे. कुटुंबातील नागरिकांना अधिकाधिक चांगल्या सोयी सुविधा मिळाव्या, यासाठी माझे प्रयत्न सुरू असतात. त्याचाच एक भाग म्हणून बारामतीचा विविध भागात दौरे केले जात आहेत.’
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमधून निवडणूक लढण्याची इच्छा राहिली नसल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. ‘बारामतीमधून ७ ते ८ वेळा निवडणूक लढवून विजयी झालो त्यामुळे आता इच्छा राहिली नाही. अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांचे धाकटे पुत्र जय पवार हे बारामतीतून महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढतील, अशी चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. त्यामुळे आता बारामतीमध्ये काका-पुतणे की भाऊ-भाऊ नेमका कोणता सामना रंगणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
-महत्वाच्या बातम्या-
-पुणे पोलीस दलात मोठी खळबळ; IPS भाग्यश्री नवटक्के यांच्यावर गुन्हा दाखल, नेमकं कारण काय?
-बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आसारामला पुण्यात का आणलं?
-संयुक्त दहीहंडीला पुणेकरांची पसंती, पूनीत बालन ग्रुपच्या दहीहंडीचा थरार
-युतीचा धर्म फक्त भाजप शिवसेनेने पाळायचा का? मुळीकांनी आमदार टिंगरेंना सुनावलं