पुणे : लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. अवघे चार महिन्यांवर विधानसभेची रणधुमाळी येऊन ठेपल्याने सत्ताधारी महायुती तसेच महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणीला सुरुवात देखील झाली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपसह महायुतीला मोठा फटका बसला तर महाविकास आघाडीला मोठे यश मिळाल्याने त्यांच्या महत्त्वकांक्षा वाढल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेने आता स्वबळासाठी चाचपणी सुरू केलीये. पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात सर्वे देखील सुरू असल्याची खात्रीलायक माहिती पुढे आली आहे. खाजगी संस्थेकडून हा सर्व्हे सुरू असल्याचं पक्षातील बड्या पदाधिकाऱ्याने सांगितलं आहे.
नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आपला बिनशर्थ पाठिंबा असल्याच जाहीर करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला साथ दिली होती. लोकसभा निवडणूक पार पडताच राज्यामध्ये मुंबई व कोकण विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडत आहे. यामध्ये सुरुवातीला मनसेकडून आपला उमेदवार जाहीर करण्यात आला, मात्र भाजपसह माहितीकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की ओढवली. लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसलेला फटका आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मनसेला वाईट अनुभव आल्याने विधानसभेसाठी स्वबळाची चाचपणी केली जात आहे.
पुणे शहरात एकूण आठ विधानसभा मतदारसंघ असून, भाजपचे सहा तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन विद्यमान आमदार आमदार आहेत. मनसेच्या स्थापनेनंतर पुणे शहराने राज ठाकरे यांना मोठा पाठिंबा दिला होता. दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या रूपाने खडकवासला विधानसभेत मनसेने आपला झेंडा देखील फडकवला. पक्षाला महापालिका निवडणुकीत देखील चांगले यश मिळाले होते. परंतु गेल्या काही काळामध्ये अपेक्षित अशी कामगिरी करता आलेली नाही. २०१७ साली नगरसेवकांची संख्या अवघ्या दोनवर पोहोचली, त्यामुळे पक्षाला नव्याने उभारी देण्याचे आव्हान राज ठाकरे यांच्यापुढे आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शिंदे-फडणवीस सरकारचं शेवटचं अधिवेशन फडणवीसांना पडणार भारी; पुणे ड्रग्ज प्रकरणावरुन ठाकरे गट घेरणार
-पुण्यातील फक्त २३ पब अन् बारला परवानगी; त्यातील १ रद्दही झालाय, वाचा नेमका काय प्रकार
-धक्कादायक! पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव; डॉक्टरला अन् मुलीला झिकाची लागण
-पुण्यात डेंग्यू रुग्णसंख्या वाढली; पालिका प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपायोजना
-‘मी बारामतीची जबाबदारी दुसऱ्यांवर दिली होती, पण…’; शरद पवारांचा अजितदादांना अप्रत्यक्ष टोला