पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत वादानंतर बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटांसाठी अधिकच महत्वाची आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची लोकसभा निवडणुकीत एन्ट्री झाली आहे. त्यांनाच लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याची दाट शक्यता आहे. अशातच आता सुनेत्रा पवार यांचे भावी खासदार म्हणून बॅनर लागले आहेत.
बारामतीतील आमराई परिसरात हे बॅनर्स लागले आहेत. आमराईतील सचिन काकडे या कार्यकर्त्याने सुनेत्रा पवार यांचे भावी खासदार बॅनर लावले आहेत. मागील काही दिवसांपासून सुनेत्रा पवार या वेगवेगळ्या परिसरात दौरे करत आहे सोबतच विकासकामाचं देखील उद्घाटन करताना दिसत आहे. यावेळी बोलताना सुनेत्रा पवार वेगवेगळ्या विषयांवर भाष्यदेखील करत आहेत.
“बारामतीत अजित पवारांच्या माध्यमातून अनेक विकासकामे होत आहे. या विकासाच्या रथात नागरीकांचीही साथ आहे. यापुढेही आपण आम्हाला साथ द्याल आणि आम्ही विकासाची प्रक्रिया निरंतर चालवत राहू”, असे आवाहन सुनेत्रा पवारांनी केलं आहे. राष्ट्रवादी फुटीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघाकडे सर्व राज्याचे लक्ष लागून आहे.
“पवारांचीच सून किती दिवस काटे वाडीत राहणार आहे, असं लोकांना वाटत असेल परंतु मी जी काटेवाडीतील विकास कामासाठी चिकाटी दिली ती काटेवाडीतील लोकांच्या भविष्यासाठी नक्कीच फायदेशीर झाली, असं त्या म्हणाल्या. माझ्या कामाचा मूळ पाया काटेवाडीने दिला आहे”, असंही म्हणत अजित पवार यांनी काटेवाडीकरांना साथ देण्याचं आवाहन केले आहे.
गेल्या काही वर्षांपासून बारामतीचे नेतृत्व खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्याकडेच आहे. मात्र आता राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या येत्या लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत त्यामुळे बारामतीकरांचा कल नेमका कोणत्या गटाला मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-ड्रग्ज रॅकेट: पुणे पोलिसांनी देशातील सर्वात मोठी कारवाई; फडणवीसांनी दिले २५ लाखांचे रोख बक्षीस
-मोहोळ, मुळीक की देवधर, माध्यमांच्या सर्व्हेत खासदारकीसाठी ‘हे’ नाव आघाडीवर
-पुण्यात कोट्यावधींचे ड्रग्ज: तरुणाई नशेत टुल्ल; पिट्याभाईंच्या त्या व्हिडीओने राज्य हादरलं
-‘यंदाच्या निवडणुकीत ४० हजार मतांनी निवडणून येणार’; शहाजी बापू पाटलांचा विश्वास