पुणे : लोकसभा निवडणूक २०२४ च्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून बेकायदेशीर तसेच बनावट मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पथके नेमण्यात आली असून परराज्यातील दारुच्या अवैध वाहतुकीवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. अशातच पुणे शहरातील कोथरुड परिसरातील एका हॉटेल खिंड ढाब्यावर राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने छापा टाकला. या छाप्यात ढाबा चालक आणि मद्य पिणाऱ्या ४ मद्यपींना अटक करण्यात आली आहे.
ढाबा चालक योगेश सुरेश माथवड हे ग्राहकांना मद्य पिण्याची व्यवस्था करुन देत असतानाच राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने छापा टाकत ढाबा मालकासह ४ ग्राहकांना अटक केली. अटक केलल्या सर्वांवर एकाच दिवसात आरोपपत्र दाखल करुन न्यायालयासमोर सादर केले असता न्यायालयाने ढाबाचालकाला १ लाख रूपयांचा दंड, मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी २ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास २ महिन्याच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे.
या गुन्ह्यातील तपास अधिकाऱ्यांनी एकाच दिवसात तपास पूर्ण करून आरोपपत्र न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, कोर्ट क्र. 1 शिवाजी नगर, पुणे यांच्या न्यायालयात सादर केले. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक प्रताप बोडेकर, किरण पाटील, सहायक दुय्यम निरीक्षक संदिप लोहकरे, महिला जवान उज्ज्वला भाबड, जवान शरद भोर, गोपाळ कानडे व वाहनचालक सचिन इंदलकर यांच्या पथकाने पार पाडली.
‘ढाबा, हॉटेलच्या अचानकपणे तपासण्या करण्यात येत आहेत. ढाब्यावर दारु विक्री करणे तसेच त्याठिकाणी बसून दारु पिणे कायद्याने गुन्हा आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही अशाच प्रकारे कडक कारवाया केल्या जातील’, असे राज्य उत्पादन शुल्क सी विभागाचे निरीक्षक एस. एस. कदम यांनी कळवले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-…म्हणून आढळराव पाटील अन् अमोल कोल्हेंचं भोसरीकडे विशेष लक्ष
-शिरूरमध्ये आढळरावांची ताकद वाढणार! वळसे पाटील प्रचारात सक्रिय होणार; आजच्या भेटीत नेमकं काय घडलं?
-मावळमध्ये महाविकास आघाडी, महायुतीच्या दिग्गज नेत्यांच्या तोफा धडाधडणार
-महायुतीच्या सभेची नसरापूरमध्ये तयारी; पुणे-सातारा महामार्गावर वाहतूक विस्कळीत