पुणे : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीच्या ४२ जागांचा तिढा सुटला आहे. आता ४८ जागांपैकी ६ जागांबाबत महायुतीची चर्चा सुरु आहे. महायुतीचे इच्छुक उमेदवार श्रीरंग बारणे हे भाजपच्या चिन्हावर मावळ मतदारसंघातून लढण्याच्या चर्चा सुरु होत्या. या चर्चेला आता बारणे यांनी पुर्णविराम दिला आहे. बारणे यांनी अखेर ते कोणत्या पक्षाकडून लढणार हे स्पष्ट केले आहे.
“मी शिवसेनेकडूनच आतापर्यंत लढलो आहे. २०२४ ची लोकसभा देखील मी शिवसेनेकडूनच लढणार” असं म्हणत बारणे यांनी चर्चेला पूर्णविराम दिला. ते पिंपरीमध्ये माध्यमांशी बोलत होते. मावळ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला असला तरी महायुतीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. मावळ लोकसभा मतदारसंघावर आधीच शिवसेना शिंदे गटाने दावा केला असून श्रीरंग बारणे हेच उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे. तसा विश्वास अनेक वेळा बारणे यांनी व्यक्त केला आहे.
मात्र, शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून संजोग वाघेरे यांचं आव्हान असल्याने बारणे भाजपच्या चिन्हावर लढणार असल्याची जोरदार चर्चा होती. या चर्चेला अखेर बारणे यांनी पूर्णविराम दिला आहे. या आधीच्या लोकसभा, विधानसभा निवडणुका या शिवसेना पक्षाकडून लढले आहेत. त्यामुळे आगामी २०२४ लोकसभा देखील शिवसेनेकडून लढणार असल्याचं ठामपणे बारणे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, बारणे यांनी शिवसेनेच्या चिन्हावर लढणार असल्याचं स्पष्ट सांगितलं असलं तरीही यामध्ये बदलही होऊ शकतो. सध्या तरी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून संजोग वाघेरे विरुद्ध शिवसेना शिंदे गटाकडून श्रीरंग बारणे अशी शिवसेना विरुद्ध शिवसेना ही लढत पहायला मिळू शकते.
महत्वाच्या बातम्या-
-‘भाजपला आणखी ४ जागा मिळणार, बारामतीची जागा अजितदादांनाच’- चंद्रकांत पाटील
-वसंत मोरे शरद पवारांच्या कार्यालयात पोहचले पण पक्षप्रवेशाविनाच परतले
-शरद पवारांच्या मंचावर आले पण प्रवेश टाळला; निलेश लंकेंना नेमकी भीती कशाची?
-विजय शिवतारेंनी केला प्रचाराचा श्रीगणेशा; कन्हेरीच्या मारुतीच्या चरणी नतमस्तक
-‘मावळचे पुढचे खासदार श्रीरंग बारणे हेच असणार’; उदय सामंत यांचा विश्वास