पुणे: पर्वती विधानसभा मतदारसंघांमध्ये महिलांचा भव्य मेळावा व खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल आहे. भाजपचे पुणे लोकसभा समन्वयक व माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह अभिनेत्री प्रार्थना बेहेरे व प्राजक्ता माळी यांची महिला मेळाव्याला प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याची माहिती भीमाले यांनी दिली आहे.
रविवार 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता स्वारगेट जवळील गणेश कला क्रीडा मंच येथे पर्वती विधानसभा मतदारसंघातील हजारो महिलांच्या उपस्थिती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मतदारसंघातील भगिनींचा यावेळी सन्मान सोहळा देखील पार पडेल. आपल्या कामांमध्ये कायम व्यस्त असणाऱ्या महिलांच्या विरंगुळ्यासाठी खेळ रंगला पैठणीचा आणि होम मिनिस्टर हा कार्यक्रम देखील यावेळी पार पडणार आहे.
महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून योजनेची मोठी ब्रँडिंग केली जात आहे. पुणे शहरामध्ये देखील मोठ्या संख्येने महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे. पर्वती मतदारसंघात माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या माध्यमातून हजारो महिलांची या योजनेसाठी नोंदणी करण्यात आली. महिला मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित राहणाऱ्या बहिणींना रक्षाबंधन निमित्त आकर्षक साडी देखील भेट दिली जाणार असल्याची माहिती श्रीनाथ भिनले यांनी दिली आहे.