पुणे : पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस पब, बार आणि हॉटेल्समधून मद्य, अमली पदार्थांचे सेवन होत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. त्यातच यामध्ये अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. या सर्व प्राकरावर आता उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘पुणे शहरात पब आणि बारमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पुणेकरांनी एका व्यासपीठावर एकत्र येऊन ठोसपणे काहीतरी केले पाहिजे. पुणे हे जगातील व्यवसनामुळे पूर्ण वाया गेलेल्या शहरातील एक शहर झाले की काय, अशी प्रतिमा निर्माण करणे आपण बंद केले पाहिजे. प्रशासनाने त्यासाठी तात्पुरती कारवाई न करता सातत्याने कठोर कारवाई करत राहिले पाहिजे. यादृष्टीने दक्षता पथकात सामान्य नागरिकांना सहभागी करुन घेतले पाहिजे. सगळ्या पुण्याने मिळून ३ किंवा ७ दिवस दिवस पब आणि बिअर बार बंद करु, असे ठरवले पाहिजे’, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
‘अरे तुम्ही पब आणि बार किती वाजेपर्यंत चालू ठेवणार? शरीरशास्त्राचा नियम आहे की, रात्री ११ ला झोपले पाहिजे. मग यांच्याबाबत तुम्ही रात्रभर दारु पिण्याची आणि अमली पदार्थ सेवन करण्याची परवानगी दिली काय? पब आणि बार चालू असताना नियमांची अंमलबजावणी करण्यात मर्यादा येतात. त्यामुळे ७ दिवस क्लिअर ड्राय, त्याच्यामध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन नियमावली तयार करु, त्याच्या अंमलबजावणीचा प्रयत्न सर्वांनी करु’, असे आश्वासन चंद्रकांत पाटलांनी दिले आहे.
आमचा उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग जो आहे, त्यामध्ये अत्यंत गांभीर्याने या सगळ्याकडे पाहिले जात आहे. प्रत्येक महाविद्यालयात एक अतिरिक्त जागा निर्माण करता येईल का, याचा विचार आम्ही करत आहोत. जेणेकरुन या पदावरील व्यक्तीकडून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले जाईल. व्यसनाकडे वळण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला कोणाशी तरी बोलायचे असते. एकदा व्यक्ती व्यसनाधीन झाला की फायदा नसतो. त्यामुळे महाविद्यालयात समुपदेशकाची नवी पोस्ट निर्माण करण्याचा विचार आम्ही करत आहोत. त्यादृष्टीने येत्या पावसाळी अधिवेशनात निर्णय घेण्याचा प्रयत्न आम्ही करु, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या-
-पोर्शे अपघातातील अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर; उच्च न्यायालयाच्या निर्णयावर मृत अनिशची आई आक्रमक
-दादा, विधान परिषदेची एक जागा पुण्याला हवीच! शहर पदाधिकाऱ्यांची अजित पवारांकडे आग्रही मागणी
-Drugs Party: ड्रग्ज घेणाऱ्या ‘त्या’ दोघांची ओळख पटली; एक आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
-पोर्शे कार अपघातातील आरोपीला जामीन तर मृतांच्या पालकांना १० लाख रुपयांची मदत
-व्हायरल व्हिडीओनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; एफसी रोडवरील ‘त्या’ बारचे लायसन्स रद्द