पुणे : अनेकदा प्राण्यांची तस्करी केल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत असतात. अशीच एक संतापजनक घटना आता पुन्हा समोर आली आहे. पुण्याहून थेट कर्नाटकमधील कत्तलखान्यासाठी उंटांची तस्करी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गोरक्षक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. पिंपरी चिंचवडमधील रावेतमधून ८ ऊंट घेऊन कर्नाटककडे निघालेला ट्रक पोलिसांच्या मदतीने पकडण्यात आला आहे.
उंटांची तस्करी करणाऱ्यांविरोधात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. अरुण कुमार चिनाप्पा (वय २८, रा. कुदपल्ली, जिल्हा कृष्णागिरी, कर्नाटक) आणि लखन मगन जाधव (वय ३०, रा. करपटे वस्ती रोड, कलावती मंदीर शेजारी, काळेवाडी फाटा, वाकड) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी कृष्णा तुळशीराम सातपुते (वय २४, रा. गोकुळनगर पठार, वारजे) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी सातपुते हे वारजे परिसरामधील सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांना १३ मे रोजी रात्री साडे ८ वाजण्याच्या सुमारास मानद पशू कल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी दूरध्वनी करुन एका वाहनाबद्दल माहिती दिली आहे. रावेतवरुन एक ट्रक निघाला असून त्यामध्ये काही उंट निर्दयतेने कोंबण्यात आले आहेत. उंट कत्तलीसाठी कर्नाटक येथे नेण्यात येणार असल्याची माहिती स्वामी यांनी दिली. त्यानंतर सातपुते आणि त्यांचे मित्र मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावर वारजे भागात थांबले होते.
रात्री पावणे १०च्या सुमारास ट्रक चांदणी चौकाकडून येणाऱ्या ट्रकचा त्यांनी पाठलाग करत थांबवला. ट्रकची तपासणी केल्यावर त्यात आठ ऊंट एकत्रित बांधून ठेवण्यात आल्याचे दिसले. चारही बाजूंनी ताडपत्री लावून उंट झाकण्यात आलेले होते. उंटांचे पाय आणि तोंड निर्दयतेने बांधण्यात आलेले होते. ट्रकमध्ये चारापाण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यांना जखमा झाल्या होत्या. पोलिसांनी आरोपींकडे उंटांच्या वाहतुकीबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी ट्रक, उंट आणि तस्करी करणाऱ्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
महत्वाच्या बातम्या-
-पीएमआरडीएकडे अनधिकृत होर्डिंग हटवण्यासाठी निविदा; कारवाईसाठी पहावी लागणार वाट
-ऊन सावलीच्या खेळात पुणेकर हैराण; शहराच्या तापमानात पुन्हा होतेय वाढ
-अजित पवार नॉट रिचेबल; महायुतीत नाराज असल्याच्या चर्चेला उधाण
-घाटकोपरनंतर आता मोशीमध्ये वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळले; गाड्यांचे मोठे नुकसान