पुणे : सध्या मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन राज्यातील वातावरण तापलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा फक्त ८ महिन्यामध्येच अचानक कोसळला. त्यामुळे या घटनेवरुन राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. अशातच या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी तसेच भविष्यात अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराकडून शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मूक आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी दीपक मानकर यांनी माध्यमांशी संवाद साधला असता ते म्हणाले की, ‘छत्रपती शिवाजी राजे या देशाची अस्मिता आहेत आणि अस्मिता जपण्याचे काम प्रत्येक शिवप्रेमीने आपल्या जीवनात जपले पाहिजे. सत्ता असो नसो या राजेंच्या स्मृती आपण सर्वांनी जपायचा प्रयत्न केला पाहिजे. हा पुतळा उभारताना अनेक अक्षम्य त्रुटी झाल्याचे नाकारता येत नाही. या पुतळ्याच्या उभारणीमध्ये आर्किटेक असतील, शिल्पकार असतील जे दोषी असतील त्यांच्यावर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे.’
‘नैसर्गिक वातावरणाची माहिती घेऊन आणि त्यावर अभ्यास करून या पुतळ्याची उभारणी केली पाहिजे होती. ३५० वर्षांपासून सर्व किल्ले व पुतळे आहे तसेच आहेत, तर मग ८ महिन्यात हा पुतळा पडतो त्यामुळे याला सरकारी यंत्रणा जबाबदार आहे. यात राजकीय भांडवल न करता सर्वांनी एकत्र येऊन परत कसा चांगला मोठा पुतळा उभारता येईल, याचा विचार सर्वांनी केला पाहिजे’, असेही दीपक मानकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-अखेर बिल्डर अविनाश भोसलेंना जामीन मंजूर, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; नेमकं काय प्रकरण?
-पुणे जिल्ह्यात २१ दिवसात मतदार संख्येत लाखोंनी झाली वाढ; आकडेवारी आली समोर
-भाजपची गुंडांशी जवळीक; गुंड गजा मारणेंने केला चंद्रकांत पाटलांचा सत्कार, व्हिडीओ व्हायरल
-..तर लाडकी बहीण योजनाच बंद करू, न्यायालयाने सरकारला फटकारले; नेमकं काय घडलं?