मावळ : पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला. शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून श्रीरंग बारणे आणि त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांच्यात ही लढत झाली. मतदारसंघातील निवडणूक प्रचार खर्चामध्ये महायुतीचे श्रीरंग बारणे हे आघाडीवर आहेत. बारणेंनी सगळ्यात जास्त खर्च केला असल्याचं आता समोर आलं आहे. बारणेंच्या प्रचारासाठी एकूण ५९ लाख १६६ रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तसेच महाविकास आघाडीच्या वाघेरेंच्या प्रचारासाठी ५७ लाख १२ हजार ५४२ हजार रुपये खर्च करुन प्रचार केला.
दोन्ही उमेदवारांच्या प्रचार खर्चामध्ये चांगलीच तफावत असल्याने भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून दोन्ही उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली आहे. उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची तीन वेळा तपासणी करण्यात आली. पहिली तपासणी ३ मे, दुसरी ७ मे आणि तिसरी तपासणी ११ मे रोजी करण्यात आली. यापैकी पहिल्या तपासणीत बारणे आणि वाघेरे यांच्या प्रचार खर्चात तफावत आढळली होती. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी नोटीस बजावली होती.
बारणे यांनी ४३ लाख ८१ हजार १६६ रुपयांचा खर्च दाखविला. तर, निवडणूक विभागाच्या नोंदवहीत ५९ लाख १६६ रुपये खर्च झाल्याची नोंद केली आहे. बारणे यांच्या हिशेबात १५ लाख १९ हजार रुपयांची तफावत असल्याचे निष्पन्न झाले आहे. वाघेरे यांनी ४९ लाख ८१ हजार ६९० रुपयांचा खर्च दाखविला. तर, निवडणूक विभागाच्या नोंदवहीत ५७ लाख १२ हजार ५४२ रुपये खर्च झाल्याची नोंद आहे. वाघेरे यांच्या हिशेबात ७ लाख ३० हजार ८५२ रुपयांची तफावत आढळली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-गाड्यांच्या आकर्षक नंबरसाठी जाणून घ्या कशी असणार आरटीओची लिलाव प्रकिया?
-मतदानापूर्वी पोलीस ठाण्यात राडा; रवींद्र धंगेकरांसह ३० ते ३५ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल