पुणे: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस काल राज्यभरामध्ये भाजपच्या नेत्यांकडून विविध कार्यक्रम घेत साजरा करण्यात आला. पुणे शहरात देखील भाजप नेत्यांकडून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहरात शेकडो कार्यक्रम झाले असताना चर्चा मात्र पर्वती मतदार संघात झालेल्या आरोग्य शिबिराची होते आहे. याला कारण ठरतंय ते माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्याकडून घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरासाठी करण्यात आलेल्या भव्य तयारीची अन् पावसातही नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादाची.
देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीनाथ भिमाले यांच्या वतीने पर्वती मतदार संघात विविध ठिकाणी महाआरोग्य शिबिर आणि मोफत चष्मे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. जवळपास अडीच ते तीन हजार नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. विशेष म्हणजे सोमवारी दिवसभर पावसाच्या सरी कोसळत असताना देखील नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं पहायला मिळालं. मतदारसंघांमध्ये जवळपास 300 च्यावर फ्लेक्स या कार्यक्रमानिमित्त लावण्यात आले होते.
भिमालेंच्या पाठीवर फडणवीसांची थाप
श्रीनाथ भिमाले यांनी नुकतेच पर्वती मतदारसंघात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणि मतदार नोंदणी अभियान राबवले होते. याला देखील मतदारसंघातील नागरिकांची मोठा प्रतिसाद दिला होता. दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले असता भिमाले त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर पोहचले. मतदारसंघात राबवण्यात येणाऱ्या विविध सामाजिक कार्यक्रमांची माहिती यावेळी भिमाले यांनी फडणवीसांना दिली असता त्यांनी कौतुक केले होते.
पर्वती मतदारसंघात उमेदवारी मिळविण्यासाठी आग्रही
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पर्वती मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्यासाठी श्रीनाथ भिमाले आग्रही आहेत. मतदारसंघात वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी वातावरण ढवळून काढल्याने राजकीय वर्तुळात भिमाले यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. दुसरीकडे गेली तीन टर्मपासून आमदार असणाऱ्या माधुरी मिसाळ यांना डावलून भाजप भिमाले यांच्या नावाचा विचार करणार का? हे पाहणे देखील महत्त्वाचे असणार आहे.