राज्याच्या अर्थसंकल्पात सरकारने महिलांसाठी खास योजनेची घोषणा केली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. यामध्ये महिलांना दर महिन्याला १५०० रूपये मिळणार आहेत. याच पार्श्वभूमीवर माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्यावतीने पर्वती विधानसभा मतदारसंघात सुरू करण्यात आलेल्या मतदार नोंदणी आभियान व मुख्यमंत्री लाडकी बहीण अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
८ जुलै पासून या अभियानाला सुरुवात झाली असून १४ जुलै पर्यंत सुरू राहणार आहे. पर्वती विधानसभा मतदार संघामध्ये ३० ठिकाणी हा उपक्रम सुरू असून मतदार नोंदणी सुरू आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन फॉर्म भरायचा असला तरी या ३० ठिकाणी कार्यकर्ते नागरिकांचे ऑफलाइन फॉर्म भरून घेत आहेत व नागरिकांना ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी सर्वोतोपरी मदत करत असल्याचे चित्र या भागात फिरताना दिसून येत आहे. नाव नोंदणीमध्ये गरीब, कष्टकरी महिला या अभियानाच्या माध्यमातून वरील दोन्ही योजनेसाठी उपलब्ध करून दिलेल्या फॉर्म भरण्याच्या सुविधेचा लाभ घेत आहेत.
दरम्यान, गेल्या सोमवार पासून( दि. ८ जुलै) सुरू झालेल्या या अभियाना दरम्यान, ३० पैकी साधारण २५ ठिकाणी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून आज पर्यंत मतदार नोंदणी आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी हजारो नागरिकांचे फॉर्म भरले गेले आहेत. अभियांन संपेपर्यंत या दोन्ही योजनेचे पाच-पाच हजार नागरिकांचे फॉर्म भरण्याचे उद्दीष्ट असल्याचे श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.