पुणे : तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचे मतदान पार पडले आता लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देशभरात निवडणुकीचा प्रत्येक राजकीय पक्ष जोरदार प्रचार करताना दिसत आहे. सर्व ठिकाणी प्रचाराची धामधूम सुरू असून पुणे लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे आणि एमआयएमकडून माजी नगरसेवक अनीस सुंडके या चौघांमध्ये ही लढत होत आहे. या प्रचारात प्रत्येक उमेदवार एकमेकांवर सडकून टीका करताना दिसत आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघात हा भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मात्र गेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव करत भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. त्यानंतर धंगेकर आणि रासने यांच्यात ‘बॅनरवॉर’ सुरू झालं. त्यातच आता रवींद्र धंगेकर हे लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर हेमंत रासने यांनी धंगेकरांवर निशाणा साधला आहे.
“१३ महिन्यांपूर्वी रविंद्र धंगेकर हे कसबा विधानसभा मतदारसंघात अपघाताने आमदार झाले. त्या निवडणुकीत सर्व पक्ष एकत्रित आले. त्यामुळेच रविंद्र धंगेकर यांचा विजय झाला. माझा पराभव झाल्यावर मी दोन दिवसांनंतर मतदार संघातील प्रत्येक भागात जाऊन काम करीत आहे. या संपूर्ण कालावधीत रविंद्र धंगेकर यांनी केवळ फ्लेक्सबाजी करण्यावरच भर दिला आहे. मागील १३ महिन्यांच्या कालावधीत माझ्याकडे जवळपास २ हजारांहून अधिक तक्रारी आल्या. त्या सर्व तक्रारींचं निवारण करण्याचं काम केलं आहे. त्यामुळे मी आज एकच सांगू इच्छितो की, रविंद्र धंगेकर यांचं काम दाखवा, हजार रुपये मिळवा”, अशी ऑफर भाजपच्या हेमंत रासने यांनी नागरिकांना दिले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मुरलीधर मोहोळांसाठी उद्या पुण्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार
-“मी माझ्या राजकीय जीवनात मोठी चूक केली ती म्हणजे…”; अजित पवार असं का म्हणाले?
-“शरद पवार जे म्हणतील तेच उद्धव ठाकरे करतील”; फडणवीसांचा ‘त्या’ चर्चेवरुन फडणवीसांना खोचक टोला
-“मला कोणी खोट्यात काढलं तर मी सहन नाही करणार, मी कोणाच्या ५ पैशात मिंदा नाही”
-“नुसते डायलॉग बोलत शिरुरच्या मतदारांना भुलवतोय”; शिरुरच्या सभेत अजित पवारांचा कोल्हेंवर हल्लबोल