पुणे : लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला. भाजपसह महायुतीच्या पराभवाला कारण ठरलेल्या अनेक गोष्टींपैकी राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांना सोबत घेणं, ही देखील एक महत्त्वाची बाब असल्याचं बोलले जात आहे. भाजप नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये याच मुद्यावरून सध्या संभ्रमावस्था दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोबत घेणं चूक असल्याची चर्चा सुरू असतानाच आता भाजप कार्यकर्त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात झालेल्या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत थेट अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्यात झालेली पिछेहाट पाहता भाजपने प्रमुख नेत्यांना निरीक्षक म्हणून 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये धाडले आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीतून लढलेले राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार शिवाजीराव आढाराव पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला. माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरूर मध्ये भाजपची बैठक पार पडली. यावेळी राहुल कुल, माजी आमदार योगेश टिळेकर यांच्यासह सर्वप्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष असणारे सुदर्शन चौधरी यांनी “कार्यकर्त्यांचे मन काय सांगतेय हे ऐकून जर निर्णय घेणार असाल, तर अजितदादांना महायुतीतून बाहेर काढा. त्यांनी आजवर भाजप नेते आणि कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे” अशी भावना व्यक्त केली.
नेमकं काय म्हणाले सुदर्शन चौधरी?
“कार्यकर्त्यांचे मन काय सांगतेय हे ऐकून जर निर्णय घेणार असाल, तर अजितदादांना महायुतीतून बाहेर काढा. त्यांनी आजवर भाजप नेते आणि कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे. आमच्या अनेक लोकांना महामंडळ तसेच मंत्री पद मिळाले असते, विधानसभेला अजित पवार जर आमच्यासोबत राहणार असतील तर अशी सत्ताच भाजप कार्यकर्त्यांना नको. स्वाभिमानी नेतृत्व पुणे जिल्ह्याला मिळत नसल्याने लोकांचे हाल झालेले आहेत. गेली दहा-दहा वर्ष आम्ही त्यांच्याशी दोन हात करत आहोत, मात्र आता त्यांच्यासोबतच हात मिळवणी कशासाठी करण्यात आली हे समजत नाही. आम्ही काय अजितदादांसाठी सत्ता आणायची का? पालकमंत्री होऊन त्यांनी बॉस व्हायचं आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम करायची, असे होणार असेल तर ही सत्ता आम्हाला नको.”
महत्वाच्या बातम्या-
-पुणेकरांनो सावधान! डासांपासून सावध रहा; शहरात सापडला झिकाचा तिसरा रुग्ण
-महाराष्ट्रातील ‘या’ 8 आमदारांनी दिले राजीनामे; वाचा नावे
-‘महायुतीत खडकवासल्याची जागा शिवसेनेला हवी’, शिंदेंच्या शिलेदाराने थोपटले दंड; नेमकं गणित काय?