आंबेगाव: शिरूर लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे यांच्यामध्ये जोरदार राजकीय लढाई पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून लढणारे अमोल कोल्हे यांच्याकडून सुरू असलेल्या टीकेला आढळराव पाटील यांच्यासह महायुतीच्या नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. आता आमदार अतुल बेनके यांनी आढळराव पाटील यांना सर्वाधिक मताधिक्य हे जुन्नर तालुक्यातून मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
जुन्नर तालुक्यातील नागरिक हे ठामपणे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पाठीशी उभी राहील. माहितीच्या माध्यमातून तीन पक्ष एकत्र आल्याने तालुक्यातील सर्वाधिक मते शिवाजी दादांना पडतील, ते काम करणारा माणूस म्हणून ओळखले जातात. त्यामुळे शिरूर लोकसभेतून शंभर टक्के विजयी होणार आहेत, असा विश्वास अतुल बेनके यांनी व्यक्त केला.
पंधरा वर्षे खासदार राहिलेले आढळराव पाटील यांचा 2019 साली अमोल कोल्हे यांनी पराभव केला होता. आता महायुती सरकारच्या माध्यमातून आढळराव पाटलांनी शिरूरसाठी भरपूर विकासकामे केली. सातत्याने मतदारसंघात फिरत लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. जवळपास १६०० कोटींपेक्षा जातीचा निधी त्यांनी मतदारसंघात आणल्याचा दावा केला आहे. महायुतीच्या माध्यमातून आढळराव पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानंतर शिरूरमधील जनतेसह आसपासच्या तालुक्यातील नेत्यांचाही त्यांना पाठींबा मिळताना दिसत आहे.