शिरूर : शिरूर लोकसभा मतदारसंघांतील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज उद्या पुण्यामध्ये मोठ्या शक्ती प्रदर्शनात दाखल केला जाणार आहे. पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि शिवाजीराव आढाराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महायुतीकडून जोरदार तयारी केली जात आहे. पुणे शहरामध्ये नदीपात्रात मोठ्या सभेचे देखील आयोजन करण्यात आलं आहे. तर २९ एप्रिल रोजी जिल्ह्यातील चारही मतदारसंघांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आज महायुतीची बाठीक पुण्यात बैठक पार पडली.
महायुतीच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, ” लोकसभेसाठी शिरूरमध्ये महायुतीचा प्रचार सुरू असून उद्या पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासह सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहोत. त्याच अनुषंगाने आज बैठक पार पडली. तसेच यापुढे आता महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी प्रचाराची पद्धत काय असावी यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली”
तर गेल्या महिन्याभरापासून मतदारसंघाची परिस्थिती पाहता सगळ्याच मतदारसंघातून राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप हे तिन्ही प्रमुख पक्षाचे कार्यकर्ते हातात हात घालून काम करीत आहेत. यातच आता मनसेचा देखील समावेश झाल्याने मनसेचे कार्यकर्ते देखील मोठ्या उत्साहाने प्रचारामध्ये सहभागी झाले आहेत. तर उद्या सकाळी आम्ही उमेदवारी अर्ज सादर करणार आहोत. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यासह चंद्रकांत पाटील देखील उपस्थित राहणार असल्याचे आढळरावांनी सांगितलंय.
दरम्यान, यावेळी त्यांनी विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यावर देखील टिकास्त्र सोडलं. “गेल्या अनेक दिवसांपासून पाहतोय की, विद्यमान खासदाराला गावाच्या वेशीवरून हाकललं जात आहे. आमच्या गावातल्या सरपंचाचा देखील त्यांनी फोन उचलला नाही. त्यांनी तर २२ निवेदन दिली पण त्यावर एकावरही कारवाई केली नाही. त्यामुळे त्यांना गावाच्या बाहेर हाकलून लावण्याचा प्रकार आता दिवसेंदिवस वाढत आहे” अशी टीकाही आढळराव पाटील यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-आकर्षक वाहन क्रमांकाच्या लिलाव प्रक्रियेत आता दलालांचा शिरकाव; आरटीओमध्ये ‘काळाबाजार’
-राज ठाकरे अजितदादांसाठी मैदान गाजवणार; बारामतीमध्ये होणार भव्य सभा
-…म्हणून पंतप्रधान मोदींची सभा एस. पी. मैदानावर नाही तर शहरातील ‘या’ मैदानावर होणार
-ससूनमधील मद्य पार्टी करणाऱ्या डॉक्टरांचे फोटो दाखवत अजित पवारांनी काढले वाभाडे; तरीही कारवाई नाहीच
-शिखर बँक प्रकरणात मोठी अपडेट, सुनेत्रा पवारांना मिळाला दिलासा!