पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचाराला चांगलाच जोर आला आहे. महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रचारादरम्यान जुन्नर गावभेट दौऱ्यावेळी पिंपळगाव सिद्धनाथ येथे भेट दिली. यावेळी गावकऱ्यांनी आढळरावांचे जंगी स्वागत केले. प्रचार करताना आढळराव पाटलांनी त्यांचे प्रतिस्पर्धी अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली आहे.
”आपल्याला असा खासदार निवडून देण्याची गरज आहे जो आपले प्रश्न दिल्लीत मांडेल. आणि दिल्लीतून निधी आणून आपल्याला मतदार संघाचा विकास करेल. या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने विकासाच्या गोष्टी करायला पाहिजे, पण टीका करण्यावर भर दिला जातोय. विद्यमान खासदार गल्ली फिरायचं नाही म्हणतात. पण ते विसरून जातात की, गल्लीतली माणसं तुम्हाला दिल्लीत पाठवत असतात. जुन्नर तालुक्यातील विकास कामे फक्त कागदावर आहेत. मला ते प्रत्यक्षात उतरवायचे आहेत. पर्यटनासाठी जुन्नर तालुका सक्षम पर्याय आहे. पर्यटन म्हणून अनेक प्रकार निधी आपण आपल्या तालुक्यात आणू शकतो”, असं शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले आहेत.
‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतून आपण प्रचार दौरा सुरू केला याचा अभिमान आहे. विद्यमान खासदार यांच्या जनतेबद्दल बिलकुल तळमळ नव्हती, जो माणूस निवडून देतो त्याला आपल्याबद्दल तळमळ असली पाहिजे. शाश्वतीने काम करणारा व्यक्ती पाहिजे. ते व्यक्ती आहे शिवाजीराव आढळराव पाटील आता आपल्या तालुक्याला दादांची गरज आहे. धरणातील पाणी नदीला कमी पडू देणार नाही असा शब्द देतो’, असं आमदार अतुल बेनके म्हणाले आहेत.
यावेळी गावातील पदाधिकाऱ्यांनी फेटा बांधून औक्षण करून आत्मियतेने स्वागत केले. आढळराव पाटलांनी बैलगाडीतून रॅली काढली. आढळराव पाटील यांच्या स्वागतासाठी जेसीबीतून दोन्ही बाजूला फुलांचा वर्षाव करण्यात आला. त्यानंतर श्री समर्थ मंगल कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या-
-‘मी डमी नाही डॅडी उमेदवार’; आढळराव पाटील अन् अमोल कोल्हेंच्यात डमी उमेदवारावरुन जुंपली
-अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्या प्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांकडून क्लीन चिट
-मुरलीधर मोहोळांकडे आहे २४ कोटींचा मालमत्ता अन् एवढ्या कोटींचं कर्ज
-‘अजितदादा म्हणजे विकास कामे करणारे नेते‘; सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी आठवलेंचा झंझावाती दौरा
-‘त्यांना कदाचित बहिणीचं प्रेम कमी पडलं असेल’; सुप्रिया सुळेंची अजितदादांवर टीका