पुणे : राज्यात सुरु असणाऱ्या विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया येत्या २० नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. मतदानाच्या दिवशी सर्वांना सुट्टी असते. अनेक शिक्षकांना निवडणूक कर्तव्यावर पाठवले जाणार आहे. त्यामुळे १८ ते २० नोव्हेंबर या कालावधीत शाळा भरवणे शक्य नसल्यास मुख्याध्यापकांना त्यांच्या अखत्यारित शाळा बंद ठेवण्यासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी आवश्यक सूचना देण्याचे निर्देश शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तांना दिले आहेत. मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पडावी यासाठी केलेले हे नियोजन असेल खरे पण इथेच चिंतेची पाल चुकचुकत असल्याचे माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी सांगितले आहे.
‘आपल्याकडे मतदानाच्या दिवशी सुट्टी असते. नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून तशी तरतूद आहे. पण आपण बघत आलोय की मतदानाला जोडून सुट्टी आली किंवा मतदान विकएंड ला आले की अनेकजण कुटुंबाला घेऊन बाहेर फिरायला जातात. त्याचा मतदानावर परिणाम होतो आणि विशेषतः शहरी भागात मतदानाचे प्रमाण कमी होते. यावर पालकांनी दक्ष होऊन विचार करावा म्हणून अनेक शाळांनी मुलांकडून पालकांसाठी भावनिक पत्र लिहून घेतले. त्यात पालकांना जागरूक नागरिक म्हणून मतदानाचे कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले. आता याच शाळा मतदानाआधी दोन दिवस तयारीसाठी सुट्टी देणार असतील तर मग या उपक्रमाचा काय उपयोग?’, असा सावल सनी निम्हण यांनी उपस्थित केला आहे.
‘यावेळी मतदान विकएंडला न घेता आठवड्याच्या मध्ये वर्किंग डे ला घेण्याचा निर्णय घेतला होता. पण आता विकएंडला जोडून शाळांना दोन दिवसांची सुट्टी असेल तर हा हेतू साध्य होईल का? आता तर बाहेर जाण्यासाठी सलग चार दिवसांची सुट्टी असा विचार करून नागरिक बाहेर गेले तर मतदानाचे काय? याचा विचार हे नियोजन करताना व्हायला हवा. अजूनही वेळ गेली नाही. शाळांनी याचा पुन्हा विचार करावा असे एक जागरूक नागरिक म्हणून माझे मत आहे’, असेही सनी निम्हण म्हणाले आहेत.
समजा असे झाले नाही तर माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण सुट्टीच्या नादात राष्ट्रीय कर्तव्याला सुट्टी देऊ नये. आपण सुजाण आहात. लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान किती महत्वाचे आहे हे आपण जाणता. चला तर मग सुट्टीचा मोह बाजूला ठेऊया आणि राष्ट्रीय कर्तव्याला प्राधान्य देऊया. मतदान करूया आणि एक जबाबदार लोकप्रतिनिधी निवडूया!, असेही आवाहन सनी निम्हण यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
-“कसब्यात राष्ट्रीय खेळाडू घडावे, क्रीडा धोरणाची करणार प्रभावी अंमलबजावणी”- हेमंत रासने
-‘पर्वती फर्स्ट’मुळे मतदारसंघाचा होणार कायापालट; पर्वतीच्या विकासासाठी आबा बागुलांचं व्हिजन
-इंदापूरात दोन्ही पवारांची प्रतिष्ठा पणाला; भरणे जागा राखणार की, हर्षवर्धन पाटील गड हिसकावणार?
-बालेकिल्ल्यात दोन्ही राष्ट्रवादीची प्रतिष्ठेची लढाई; पिंपरी विधानसभेवर कोण आपला झेंडा रोवणार?