पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जागांवर सात मे रोजी मतदान पार पडणार आहे. तर पुणे जिल्ह्यातील पुणे, मावळ आणि शिरूरमध्ये 13 मे रोजी मतदान पार पडेल. महायुती तसेच महाविकास आघाडी कडून बढाने त्यांच्या सभांचे आयोजन करण्यावर सध्या भर दिला जात असल्याचं दिसत आहे. दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची रेसकोर्स मैदानावर जंगी सभा पार पडली. या सभेला जवळपास लाखाच्यावर नागरिक उपस्थित राहिल्याने महायुतीच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मोदींच्या सभेनंतर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये विशेषतः हडपसर आणि भोसरी विधानसभेत महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचाराला गती आली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाकडून घड्याळ या चिन्हावर शिवाजीराव आढळराव पाटील निवडणुक लढवत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचा विचार करता खेड, आंबेगाव, जुन्नर आणि हडपसर विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विचाराचे आमदार आहेत. त्यामुळे सहापैकी ४ मतदारसंघात राष्ट्रवादी ताकद वैयक्तिकरित्या मोठी आहे. तसेच भोसरीमध्ये भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी तब्बल १ लाखांचे मताधिक्य देण्याचा निर्धार केलाय. तर दुसरीकडे केवळ शिरूरचे आमदार अशोक पवार यांच्या रूपाने जेष्ठ नेते शरद पवारांसोबत एक आमदार उभा आहे. या ठिकाणी देखील महायुतीकडून भाजपचे नेते आणि जिल्हा परिषद माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या माध्यमातून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली आहे.
दरम्यान, महायुतीकडून कोणतीही रिस्क घेतली जाताना दिसत नसून प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या कामाचा हिशोब घेतला जात आहे. प्रत्येक पदाधिकारी त्यांना दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडतो किंवा नाही ? याचा लेखाजोखा प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात येणार असल्याची विश्वसनीय माहिती पुढे आली आहे. त्यामुळे अपेक्षित काम न केलेल्या नेत्यांवर पक्षाची नाराजी वाढल्यास ते अडचणीत येऊ शकतात, ही गोष्ट लक्षात घेऊन महायुतीतील सर्वच पदाधिकारी अंग झाडून कामाला लागले आहेत.
महायुतीची वज्रमूठ…
मोदी यांनी आपल्या भाषणात बोलताना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना लक्ष्य केले. “गेल्या ४५ वर्षापासून महाराष्ट्र अतृप्त आत्म्यांची शिकार ठरला आहे,” असा घणाघात केला. महाविकास आघाडीची मदार राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या खांद्यावर आहे. दोन दिवसांपूर्वी उरळी कांचन येथे आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी पार पडलेल्या शरद पवारांच्या सभेला अपेक्षीत प्रतिसाद न मिळाल्यामुळे महाविकास आघाडीच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता पहायला मिळत आहे. दुसरीकडे, मोदींच्या सभेमुळे महायुतीला मात्र चैतन्य प्राप्त झाले आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-…म्हणून आढळराव पाटील अन् अमोल कोल्हेंचं भोसरीकडे विशेष लक्ष
-शिरूरमध्ये आढळरावांची ताकद वाढणार! वळसे पाटील प्रचारात सक्रिय होणार; आजच्या भेटीत नेमकं काय घडलं?
-मावळमध्ये महाविकास आघाडी, महायुतीच्या दिग्गज नेत्यांच्या तोफा धडाधडणार
-महायुतीच्या सभेची नसरापूरमध्ये तयारी; पुणे-सातारा महामार्गावर वाहतूक विस्कळीत