पुणे : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघात हायव्होल्टेज लढाई सुरू असून महायुतीचे शिवाजी आढळराव पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे यांच्यामध्ये सामना होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आढळराव पाटील यांना उमेदवारी देण्यास पहिल्यांदा विरोध करणारे आमदार दिलीप मोहिते हे आता अंग झटकून कामाला लागले आहेत. दिलीप मोहिते पाटलांनी शिरुरचे खासदार अमोल कोल्हेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
“मागच्या वेळी डॉ. अमोल कोल्हे यांच्या विजयासाठी जीवाचं रान केलं. त्यांना निवडणुकीत मोठ्या मताधिक्यानं निवडून आणलं. परंतु मला त्यांनी चहा सुद्धा पाजला नाही. खासदाराने संसदेत प्रश्न मांडण्यापेक्षा जनतेच्या दैनंदिन अडचणी समजून घ्यायला हव्यात. लोकांनी आम्हाला आमदार, खासदार केलं. त्यामुळे संसदेत आणि विधानसभेत प्रश्न मांडले तर आम्ही उपकर करत नाही. तुम्ही संसदेत प्रश्न मांडले , मी विधानसभेत मांडले, लोकांनी प्रश्न मांडण्यासाठी आपापल्या उमेदवाराला निवडून दिले आहे. त्यामुळे आपण उपकार करत नाही.” असा घणाघात दिलीप मोहिते यांनी केला आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी आढळरावांचा पराभव केला होता. मात्र आता राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. त्यामुळे अमोल कोल्हे यांच्या समोर आढळराव पाटलांचं मोठं आव्हान असणार आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आढळराव पाटलांच्या मागे अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मोठी ताकद असल्याचं दिसतंय. या मतदारसंघात येणाऱ्या ६ विधानसभेत ५ आमदार महायुतीसोबत आहेत. त्यामुळे कोल्हेंना विजय मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“अख्खा महाराष्ट्र जाणतो मी असलं काही करत नाही”; अजित पवारांनी संजोग वाघेरेंना धरलं धारेवर
-Lok Sabha Election | ‘बारणेंचा प्रचार करणार नाही’; मावळात महायुतीच्या बैठकीत नाराजीचा सूर!
-Lok Sabha Election | शरद पवारांकडून दुष्काळी गावांची पाहणी; पाणी प्रश्वावरुन भाजपला धरणार धारेवर