हडपसर : शिरूर लोकसभा मतदारसंघात हायव्होल्टेज राजकीय लढाई पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यामध्ये येथे सामना होणार आहे. यामध्येच शिरूर भागामध्ये वलय असणारे मंगलदास बांदल यांना वंचित ने मैदानात उतरवले आहे. तिन्ही मातब्बर नेत्यांमध्ये येथे चुरशीची लढाई पाहायला मिळत आहे. आढळराव पाटील यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी शिवसेनेकडून हडपसर मध्ये मोठा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी हडपसरमधून ५० हजारांपेक्षा अधिकचा लीड देण्याचं विश्वास यावेळी व्यक्त केला.
शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत गोगावले, महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढाव पाटील तसेच शहराध्यक्ष नाना भानगिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचा मेळावा पार पडला. यावेळी बोलताना भानगिरे म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रामध्ये महायुतीचे ४५ खासदार विजयी करण्याचा शब्द दिला आहे. शिवाजीराव आढळराव पाटील हे आज शरीराने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असेल तरी मनाने शिवसेनेमध्ये आहेत. या निवडणुकीमध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघातून किमान ५० हजारांचा लीड देणार. कार्यकर्त्यांनी कोणतीही शंका न ठेवता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी काम करावं”
दरम्यान, यावेळी बोलताना शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “पुणे नाशिक हायवेसाठी २००८ ते २०१३ तत्कालीन काँग्रेस सरकारसोबत भांडलो. त्यानंतर मंजुरी मिळाली तर नितीन गडकरी यांच्या कार्यकाळात टेंडर निघाले. आज बोलणारे त्यावेळी राजकारण नव्हते, यामध्ये मी केलेला पाठपुरावा दाखवतो त्यांनी त्यांचे योगदान दाखवावे. बैलगाडा शर्यत चालू करण्यासाठी मी स्वतः औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून लढलो. हायकोर्टात देखील मीच याचिका केली. बंदी उठवण्याच्या आंदोलनामध्ये माझ्यावर केसेस दाखल आहेत. आज हे केवळ श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असून ते केवळ एक्टिंग करण्यासाठी घोडीवर बसणारे आहेत”, असा टोला आढळराव पाटील यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या-
-मुरलीधर मोहोळांच्या प्रचारासाठी भाजपचा ‘मेगाप्लॅन‘; असे पोहचणार १० ते १२ लाख नागरीकांपर्यंत
-निवडणूक आयोगाने घातल्या खर्चाच्या मर्यादा; प्रचारात उमेदवारांना महागड्या गाड्या वापरणं पडणार महागात
-‘काँग्रेसची गॅरंटी म्हणजे चायना मालासारखीच‘; भाजप नेत्याची खरमरीत टीका