पुणे: विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर राज्यामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे वेध लागले आहेत. न्यायालयात दाखल असणाऱ्या विविध याचिकांवर लवकरच सुनावणी होणार असून यामध्ये निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्रमध्ये महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी सत्ताधारी पक्षांमध्ये उड्या मारण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या पाच नगरसेवकांनी भाजपमध्ये जाण्याची घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे पुण्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात असून भाजपची ताकद आणखीन वाढली. या प्रवेशामुळे मात्र शिंदेंच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे हे थेट भाजपला भिडले आहेत.
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात शिवसेनेची पक्ष बांधणी मोठ्या प्रमाणावर मजबूत झाली असून मागील काळात पुणे महानगरपालिका निवडणुकीत धनुष्यबाण चिन्हावर लढवलेल्या सर्व जागा शिवसेनाच लढवेल, अशी भूमिका शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी मांडली आहे. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भानगिरे यांनी केलेल्या दाव्यामुळे भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेल्या ठाकरेंच्या नगरसेवकांची अडचण होऊ शकते.
पुणे शहरात प्रभागनिहाय शिवसैनिकांची बैठक आयोजित करून अनुकूल असणाऱ्या प्रभागात मतदारांचा सर्व्हे केला जात असून इतर पक्षातील कोणतेही नगरसेवक महायुतीतल्या घटक पक्षात सामील झाले, तरीही राज्य पातळीवर महायुतीचा ठरलेला फॉर्म्युलाच संपूर्ण राज्यात राबविल्या जाणार आहे. येत्या काळात शिवसेनेत काही नगरसेवक व विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर प्रवेश करणार असल्याचं प्रमोद भानगिरे यावेळी म्हणाले.
पुण्यातील ठाकरे गटात असणारी नाराजी चव्हाट्यावर आली आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे, बाळा ओसवाल, पल्लवी जावळे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली. हे सर्व माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणारं असल्याने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.