पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार हे राज्यात विविध ठिकाणी कार्यकर्ता मेळावा घेत आहेत. आजही लोणावळ्यात शरद पवारांनी कार्यकर्ता मेळव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात शरद पवारांच्या उपस्थितीत अजित पवार गटाच्या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह १३७ शरद पवार गटात जाणार आहेत.
‘भाजप म्हणजे वॉशिंग मशीन, आरोप करा आणि पक्षात प्रवेश देऊन धुवून काढा, भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे’, अशा शब्दांत शरद पवारांनी भाजपवर ताशेरे ओढले आहेत. या मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शरद पवारांनी भाजपवर शरसंधान साधलं आहे.
‘मी इथे आलो तेव्हा मला सांगण्यात आलं की, इथल्या काही लोकांनी आणि स्थानिक आमदाराने आजच्या बैठकीला तुम्ही येताय म्हणून तुम्हाला दमदाटी केली. कोणीतरी त्यांच्यावर टीका केली म्हणून त्यांनी त्या टीकाकारांनाही फोन करून दम दिला. हा काय प्रकार आहे? कोणी चूक केली तर त्यांच्यावर टीका करायची नाही का? लोकशाहीत जाहीर बोलायचं नाही का? कोणी बोललं तर दमदाटी होते’, असं म्हणत शरद पवारांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांचे नाव न घेता सुनावलं आहे.
‘इथले जे आमदार दमदाटी करत आहेत त्यांना मला सांगायचं आहे की, बाबा रे तू आमदार कोणामुळे झालास आठवतंय का? तुझ्या प्रचारसभेला इथे कोण आलेलं आठवतंय का? तेव्हा पक्षाचा अध्यक्ष कोण होता? निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी पक्षाचं चिन्ह लागतं, पक्षाचा फॉर्म लागतो, तो फॉर्म आणि चिन्ह तुला कोणी दिलं? तुझ्या अर्जावर कोणाची सही होती?, असा सवाल करत सुनील शेळकेंना शरद पवारांनी खडेबोल सुनावले आहेत.
‘तू माझ्या सहीने तुझा अर्ज भरला होतास. तुम्ही लोक आज त्याच पक्षाच्या आणि विचारांच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करता? तुला निवडून आणण्यासाठी जे कार्यकर्ते राबले, ज्यांनी तुझ्यासाठी घाम गाळला, त्यांनाच तू दमदाटी करतोस. माझी त्या आमदाराला विनंती आहे. एकदा दमदाटी केलीस, पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात मला. मी या रस्त्याने कधी जात नाही. परंतु, या रस्त्याने जाण्याची स्थिती कोणी निर्माण केली तर मी त्याला सोडतही नाही’, असा सज्जड इशारा शरद पवारांनी सुनील शेळकेंना दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘भाजप हे वॉशिंग मशीन, आरोप करा अन् पक्षात प्रवेश देऊन धुवून काढा’; शरद पवारांची जहरी टीका
-अजित पवारांना मोठा धक्का; ‘वेळ पण तीच मालक पण तोच’, म्हणत पदाधिकाऱ्यांसह १३७ जणांचा राजीनामा
-स्वकियांना चिंता की विरोधकांना धास्ती! मोहोळांविरोधात ‘तो’ बॅनर नेमका लावला कोणी?
-‘भाजप भ्रष्ट जुमला पक्ष, निवडणूक जिंकण्यासाठी ते कोणत्याही थराला जातील’; सुप्रिया सुळेंची जहरी टीका
-‘ज्या २२ आमदारांचा उल्लेख केला त्यातली २ तरी जाहीर करा’; सुनिल शेळकेंचे रोहित पवारांना आव्हान