पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही समर्थक आमदारांसह भाजप आणि शिंदे गटासोबत हातमिळवणी करत वेगळा गट तयार केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर गट आणि शरद पवार गट तयार झाले. त्यातच विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या जोरावर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निवडणूक चिन्ह हे अजित पवार गटाला देण्याचा निकाल दिला. यानंतर बारामती नेमकी कोणाची? यावरून दोन्ही गटांमध्ये गेल्या काही दिवसांपासून टोकाचा वाद सुरु आहे.
आगामी लोकसभा निवडणूक जिंकून बारामती मतदारसंघावर आपलं वर्चस्व असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न दोन्ही गटांकडून करण्यात येत आहे. मतदारसंघामध्ये भेटीगाठी, मेळावे, उद्घाटन यांची रेलचेल पाहायला मिळत आहे. अशातच आता खुद्द शरद पवार बारामतीच्या मैदानात उतरणार असून, चार दिवस ते बारामतीमध्ये तळ ठोकून असणार आहेत.
अजित पवार आणि शरद पवार या दोन्हीही गटांसाठी बारामती लोकसभा मतदारसंघ प्रतिष्ठेचा बनला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून दोन्ही गटांकडून बारामतीसाठी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. शरद पवार १५ फेब्रुवारीपासून सलग ४ दिवस हे स्वतः बारामती लोकसभा मतदारसंघात तळ ठोकून राहणार असल्याचं बोललं जात आहे.
सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीत पक्षाला बळ देण्यासाठी पवार कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आढावा घेणार असल्याचं बोललं जात आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हासाठी कायदेशीर लढाई सुरू असताना दुसरीकडे या दोन्ही गटांमध्ये बारामती मतदारसंघातील वर्चस्वाची लढाई पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-लोकसभा निवडणुकीसाठी मनसे जय्यत तयारी; राज ठाकरे जुन्नर दौऱ्यावर
-वृक्षरोपणाला जागा नाही तरीही पुणे महापालिका लावणार ५ कोटी रुपयांची झाडे
-कोणाच्या घशात जाण्याअगोदर खडकवासल्याच्या ऑक्सिजन पार्कचं काम सुरु- चंद्रकांत पाटील
-योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्याचा प्रशांत महाराजांकडून निषेध; म्हणाले…
-पुण्यात भाजपचे इव्हेंट वॉर; इच्छुक उमेदवार सुनिल देवधर मात्र एकाकी