पुणे : महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संजाभी महाराजांवरुन सध्या राज्याच्या राजकारणात मोठा वाद सुरु आहे. रायगडावर छत्रपती शिवरायांच्या समाधीजवळ वाघ्या कुत्र्याचे स्मारक आहे. हे स्मारक छत्रपती शिवरायांच्या समाधीपेक्षाही उंचीने मोठे आहे. याच स्मारकाला हटवण्यावरुन आता राजकीय वर्तुळात मोठा वाद सुरु झाला आहे. छत्रपती घराण्याचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी वाघ्या कुत्र्याचे स्मारक रायगडावरुन हटवण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र राज्य सरकारला दिले आहे. त्यांच्या मागणीनंतर वाघ्या कुत्र्याच्या ऐतिहासिक संदर्भ शोधले जाऊ लागले, पुरावे गोळा केले जाऊ लागले.
काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?
“आज मी पुरातत्व खात्याच्या महासंचालकांची भेट घेतली. त्यांना सविस्तर इतिहास सांगितला. माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून अनेक शिवभक्तांनी पुरातत्व खात्याकडून जे मिळवलं होतं, त्याची मांडणी तिथे केली. पुरातत्व खात्याने माहितीच्या अधिकारात स्पष्टपणे सांगितलं आहे की, वाघ्या कुत्र्याचं स्मारक याची त्यांच्या सुरक्षित स्थळांच्या यादीत कुठेही नोंद नाही. वाघ्या कुत्र्याचं स्मारक १९३६ ला पूर्ण झालं. २०३६ पर्यंत ते स्मारक काढलं नाही तर त्याची नोंद संरक्षित स्थळांच्या यादीत समाविष्ट होईल ही माहितीही पुरातत्व खात्याने दिली आहे. त्यामुळे हा विषय मी घेतला आहे. अनेक शिवभक्तांनीही पूर्वी हा विषय घेतलेला आहे. दुर्दैवाने त्यावर न्याय मिळाला नाही म्हणून मी ही मागणी पुन्हा करतोय”, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत.
“छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कुत्रे असू शकतात. स्वत: महाराजांचेही काही कुत्रे असू शकतात. पण राजसंन्यास या नाटकातून एक दंतकथा निर्माण झाली. त्या नाटकाने छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली. त्यातून वाघ्या कुत्र्याची दंतकथा निर्माण झाली आणि त्याचं स्मारक तिथे बांधण्यात आलं”, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत.
दरम्यान, आता छत्रपती शिवाजी महाराजांकडे खरंच वाघ्या नावाचा कुत्रा होता का? यावर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. या वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरुन अनेक दावे, प्रतिदावे केले जात आहेत. नेमकं सत्य काय हा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-विधानसभेच्या उपाध्यक्षपदी आण्णा बनसोडेंची बिनविरोध निवड; उद्या होणार घोषणा
-संतापजनक! चौथीत शिकत असणाऱ्या चिमुरडीला खाऊ देतो म्हणत बोलवून घेतलं अन्…