पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (राईट टू इज्यूकेशन अॅक्ट) राज्यातील खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांसाठी विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया आजपासून (१४ जानेवारी) सुरु करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. राज्यभरातील १ लाख ८ हजारांपेक्षा अधिक जागा प्रवेशासाठी उपलब्ध असून, पालकांना १४ ते २७ जानेवारी या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे.
३१ डिसेंबरपर्यंत अपेक्षित नोंदणी न झाल्यामुळे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने शाळा नोंदणीसाठी ४ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानंतर या प्रक्रियेचा ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. आरटीई कायद्यांतर्गत आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये पहिली ते आठवीचे शिक्षण मोफत दिले जाते. या विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्काची प्रतिपूर्ती शिक्षण विभागाकडून शाळांना करण्यात येते.
यावर्षी प्रवेश प्रक्रियेसाठी १८ डिसेंबरपासून शाळा नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आरटीई पोर्टलवर दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यभरातील ८ हजार ८४९ शाळांनी प्रवेश प्रक्रियेत सहभाग नोंदवला आहे. या शाळांमध्ये प्रवेशासाठी एकूण १ लाख ८ हजार ९६१ जागा उपलब्ध झाल्या असून दरवर्षी सर्वाधिक जागा पुणे जिल्ह्यात उपलब्ध असतात. या वर्षीही पुणे जिल्ह्यातील ९५१ शाळांची नोंदणी झाली असून १८ हजार ४५१ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.
आरटीई प्रवेशासाठी अर्ज कसा करावा?
https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर अर्ज करावा लागणार आहे. प्रवेशासाठी अर्ज करताना पालकांनी घर ते शाळा हे अंतर अचूक टाकावे. पालकांनी अर्जासोबत घराचा पत्ता, जन्मदाखला व जात प्रमाणपत्र जोडावेच लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-महायुतीत मिठाचा खडा! तर भाजप अजितदादांच्या पोस्टरला काळं फासणार; बारामतीत नेमकं काय घडलं?
-ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; पुण्यासह ५ शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार
-समाजकंटकांकडून टेकड्या जाळण्याचा प्रयत्न; मंत्री चंद्रकांत पाटलांच्या महत्वाच्या सूचना
-मामाला संपवण्याची तयारी; पुण्यात बंदुक घेऊन फिरणाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात
-पुण्याच्या एफसी रोडवरही वाल्मिक कराडचं घबाड; एकाच इमारतीत कोट्यावधींची संपत्ती