राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्याक आघाडीचा पदाधिकारी शंतनू कुकडे विरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेच्या तक्रारीवरून कुकडेवर लैंगिक अत्याचार, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल असून त्याला अटक देखील करण्यात आली आहे. अटकेत असणाऱ्या कुकडे विरोधात शिवसेना उबाठा पक्षाकडून समर्थ पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन करण्यात आले. तर दुसरीकडे नुकतेच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले रवींद्र धंगेकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा संबंधित पदाधिकारी हिंदू कुटुंबांना टार्गेट करून त्यांचे बळजबरीने धर्मांतर घडवून आणत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
धंगेकर यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत शंतनू कुकडे नावाच्या एका नराधमावर पुणे शहरातील समर्थ पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरंतर या व्यक्तीबद्दल यापूर्वी माझ्याकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या परंतु गेल्या काही दिवसांपासून आम्ही सबळ पुराव्यांची जुळवाजुळव करत होतो. हे प्रकरण केवळ बलात्कारापुरते मर्यादित नसून ही व्यक्ती धर्मांतराचे मोठे रॅकेट पुणे शहरात राबवते. गोरगरीब हिंदू कुटुंबांना टार्गेट करून त्यांचे बळजबरीने धर्मांतर घडवून आणले जाते. काही गरजू कुटुंबातील महिला व मुलींच्या मजबुरीचा फायदा घेत त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे प्रकार या नराधमाकडून केले जातात तसेच काही हाय प्रोफाईल व्यक्तींना मुली पुरवण्यापर्यंतचा उद्योग नराधम करतो” असा गंभीर आरोप केला आहे.
समर्थ पोलीस स्टेशनकडे याबाबत यापूर्वी तक्रारी दाखल होऊन देखील त्यांनी या प्रकरणात हलगर्जीपणा केला आहे.या शंतनु कूकडे कडुन मिळणाऱ्या मलईमुळे संबंधित पोलीस स्टेशनचे अधिकारी आजवर त्याला सांभाळून घेतात, या प्रकरणात देखील मुसा, मुनीर, प्रतीक, सागर, जैन व पूनम आदी नामक व्यक्तींचा सहभाग असून हा तपास अतिशय थंड गतीने व चुकीच्या दिशेने सुरू आहे. माझी पोलीस प्रशासनास विनंती आहे की आपण या सगळ्या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी. कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदू कुटुंबीयांची अश्या प्रकारची फसवणूक करत धर्मांतराचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही, असं धंगेकर म्हणाले.
दरम्यान, हिंदू म्हणजे काय विकाऊ वाटले का….? कोणी यावं पैसे द्यावे आणि त्यांचे धर्मांतर करून त्यांच्यावर अत्याचार करावे…? पुणे शहरात या पुढील काळात या सगळ्या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. उपमुख्यमंत्री अजितदादा यांना देखील विनंती आहे, अशा प्रकारच्या नराधम व्यक्तीची पक्षातून तातडीने हकालपट्टी करावी, अशी मागणी धंगेकर यांनी केली आहे.