पुणे : दिल्लीत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमा दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की, एक पद मिळायचं, असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रविवारी केलं. या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच निषेधार्थ ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी पुण्यातील शिवाजीनगर भागातील मॉडेल कॉलनी येथील उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात आले. त्यावेळी शिवसेना (उबाठा)चे खासदार संजय राऊत यांनी देखील नीलम गोऱ्हेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केले. गोऱ्हेंवर केलेल्या टीकेवरुन पुण्यातील शिंदे शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.
शहरातील अलका टॉकीज चौकात शिवसेनेचे माजी नगरसेवक पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली संजय राऊत यांच्या विधानाच्या निषेधार्थ आंदोलन केले. संजय राऊत यांच्या फोटोला जोडे मारून निषेध व्यक्त केला. नाना भानगिरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे गट) वर गंभीर आरोप करत पक्षातील कथित भ्रष्टाचार आणि पैशांच्या व्यवहारांचा पर्दाफाश केला आहे.
‘मला देखील अंडी पिल्ली माहीत आहेत. माझ्या सारख्या अनेक कार्यकर्त्यांना २५-२५ लाखांची मागणी होत होती. स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी काही ना काही द्यावं लागत होतं’, असे म्हणत नाना भानगिरे यांनी पक्षाच्या अंतर्गत व्यवहारांवर बोट ठेवले आहे.
भानगिरे यांनी शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हेंच्या अपमानावरही संताप व्यक्त केला असून “त्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्रातील तमाम माता-भगिनींचा अपमान आहे,” असे म्हणत ठाकरे गटाच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. “संजय राऊत हे महाराष्ट्रातील वातावरण दूषित करत आहेत. भविष्यात त्यांना पुण्यात फिरू देणार नाही, त्यांना काळे फासू,” असा थेट इशारा नाना भानगिरे यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी कधी?
-धनुष्यबाण हाती घेण्याआधी धंगेकरांना ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ची ऑफर!
-राजाराम पुलावरील उड्डाणपूलाला ‘नरवीर तानाजी मालुसरे’ नाव देण्याची मागणी
-माणुसकी सोडली, बापाचे ऋण विसरल्या; मुलींकडून मान खाली घालायला लावणारं कृत्य
-भल्या सकाळी उदय सामंत राज ठाकरेंच्या भेटीला; शिंदेंच्या खास मिशनवरुन राज संतापले